महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करावी !

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे आवाहन

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये साधला विद्यार्थ्यांशी संवाद

निलेश जोशी । कुडाळ : महिला आज अनेकविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना दिसतात मात्र तरीही महिलांसंदर्भात समानतेचा विचार करणारी मानसिकता समाजामध्ये खोलवर रुजवणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले.त्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ए.एन. लोखंडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते राजश्री सामंत यांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि भरारी वार्षिकांक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना राजश्री सामंत यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी॔ना उजाळा देत महाविद्यालयाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.अधिकारी म्हणून काम करतानाचे आपले प्रशासकीय अनुभवही त्यांनी कथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ए.एन लोखंडे यांनी महिला सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण वर्गांची आवश्यकता स्पष्ट केली.शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन यामुळे महिलांमध्ये निर्णय क्षमता निर्माण होईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक डाॅ.शरयू आसोलकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.तेजश्री पटवर्धन यांनी करुन दिला.आभार प्रा.प्रज्ञा सावंत यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.यशश्री खानोलकर यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आय. टी तज्ज्ञ अभिषेक कोरडे, प्रा. सोनाली आंगचेकर प्रा. काजल मातोंडकर राजगुरू प्रा. स्वप्नजा चांदेकर प्रा. योगिता वाईरकर यांच्यासहित विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!