नाटककार चं. प्र. देशपांडे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर
डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते ४ फेब्रुवारीला कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण
केदार सामंत आणि आनंद वैद्य यांची पत्रकार परिषदेत माहिती
निलेश जोशी । कुडाळ : येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणारा यंदाचा कै. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू पुरस्कार ज्येष्ठ नाटककार पुण्याचे चं.प्र. देशपांडे यांना जाहीर झाला आहे. येत्या ४ फेब्रुवारीला कुडाळ येथे या पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक शरद भुताडीया यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत आणि आरती प्रभू अकादमीचे कार्यवाह आनंद वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. कविता आणि नाट्यलेखन यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककराला हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे. रोख रु. 11 हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला बाबा वर्दम थियेटर्सचे सह कार्यवाह अनिल आचरेकर, आरती प्रभू कला अकादमीचे कार्यवाह आनंद वैद्य, प्राचार्य ए. एन. लोखंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना केदार सामंत आणि आनंद वैद्य म्हणाले, बाबा वर्दम थिएटर्स ही कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील हौशी कलाकारांची नाटयसंस्था, कुडाळ येथील कै. बाबा वर्दम, के. वामनराव पाटणकर, कै. शंकरभाई वर्दम यांच्या प्रेरणेने व श्री. चंदू शिरसाट या प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या नेतृत्वाखाली गेली ५२ वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. कुडाळ मधीलच नामांकित शैक्षणिक संस्था क.म.शि.प्र. मंडळाने सन २०१३ मधे संस्थेच्या कुडाळ हायस्कूल, कुडाळ या प्रशालेचे माजी विद्यार्थी, प्रतिभावान साहित्यिक कै. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या नावे आरती प्रभू कला अकादमी ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत नृत्य, नाट्य, संगीत याचे प्रशिक्षण दिले जाते. क.म.शि.प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष भाईसाहेब तळेकर तसेच संस्थेचे सरकार्यवाह आनंद वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली अकादमीची वाटचाल जोमाने सुरू आहे.
कै. चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू हे कुडाळचे सुपुत्र. त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभेबद्दल कुडाळच्या साहित्य, नाट्य व शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या सर्वांना अतिशय आदर आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात याकरीता त्यांच्या नावाने कवी, कवयित्री आणि नाटककार यांना आरती प्रभु पुरस्कार दिला जातो.
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा आरती प्रभू पुरस्कार सन २०१३ पासून कविता आणि नाट्यलेखन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास दरवर्षी दिला जातो. रोख रु. ११,०००/-, स्मृतीचिन्ह, मानपत्र व शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सन २०१३ सालचा पहिला पुरस्कार गोवा येथील प्रसिध्द कवी व नाटककार विष्णू सूर्या वाघ, सन २०१४ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द नाटककार सतीश आळेकर, सन २०१५ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार शफाअत खान, सन २०१६ सालचा पुरस्कार नागपूर येथील प्रसिध्द नाटककार महेश एलकुंचवार, सन २०१७ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार श्रीम. सई परांजपे, सन २०१८ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द कवी डॉ. महेश केळूसकर, सन २०१९ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द कवी किशोर कदम उर्फ सौमित्र, सन २०२१ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, सन २०२२ सालचा पुरस्कार प्रसिध्द कवी गुरु ठाकूर, सन २०२३ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द कवयित्री श्रीम. अरुणा ढेरे यांना प्रदान करण्यात आला.
या वर्षीचा पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ नाटककार. चं. प्र. देशपांडे यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे होणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सुप्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते तसेच बाबा वर्दम थिएटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट व आरती प्रभु कला अकादमीचे अध्यक्ष अविनाश उर्फ भाईसाहेब तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह श्री. केदार सामंत व आरती प्रभू कला अकादमीचे कार्यवाह श्री. आनंद वैद्य यांनी केले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.