स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये कणकवली नगरपंचायत ला ओडिएफ डबल प्लस चे मानांकन

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश
केंद्रीय पथकाने भेट देत केली होती शहरात तपासणी
स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत केंद्र सरकार कडून राबिविण्यात येत असलेल्या हागणदारी मुक्त शहरांच्या सर्वेक्षणात यशस्वीपणे प्रमाणित होऊन कणकवली शहराने ओडीएफ ++ मानांकन मिळवले आहे. या नामांकनासाठी प्रशासनाने व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या टीम ने विशेष मेहनत घेतली होती. कणकवली नगरपंचायत च्या या यशाबद्दल सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
कणकवली शहराने २०१६ पासून हागणदारी मुक्त शहर म्हणून आपले सातत्य टिकवण्यात यंदाही यश मिळवले आहे. शहर ज्यात कोणतीही व्यक्ती उघड्यावर शौचास जात नाही, सर्व शहरवासीयांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे, शहरात लोकसंख्ये च्या प्रमाणात पुरेशी सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आहेत. तसेच सर्व सामुदायिक तथा सार्वजनिक शौचालायापैकी २५% शौचालय सर्वोत्तम दर्जाची आहेत. शहरात निर्माण होणाऱ्या सर्व मैला साठीचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. शहराचा स्वताचा स्वतंत्र मैला व सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित आहे, शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये गुगल नकाशावर (SBM TOILET) नोंदणीकृत आहेत. वरील निकषांचे मुल्याकन करण्यासाठी केंद्रीय पथकाने ऑगस्ट २०२३ मध्ये शहरात अचानक भेट दिली होती. त्यांनी शहरातील सर्व परिसरांची तसेच सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालये आणि सांडपाणी प्रकल्पांचे मुल्याकन करण्यात आले.
त्यानंतर या पथकाद्वारे केंद्राकडे अहवाल सादर करण्यात आला होता. कणकवली नगरपंचायतने केलेले काम व हागणदारी मुक्त शहराचा दर्जा टिकवण्यासाठी केलेले नियोजन कामी आले व केंद्राला मिळालेला अहवाल सकारात्मक असल्याने कणकवली शहराला ओडीएफ++ शहर म्हणून प्रमाणित केले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





