खारेपाटण येथे उद्या रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार खारेपाटण स्वतंत्र तालुका मागणी करीता भव्य महानिर्धार मेळावा

४० ते ५० गावातील सुमारे नागरिक राहणार उपस्थित

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली खारेपाटण सह आजूबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांची खारेपाटण तालुका करण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा जोर घेतला असून याकरिता उद्या रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी स.१०.३० वाजता शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे भव्य महानिर्धार मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे सचिव श्री संतोष पाटणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न होणाऱ्या या निर्धार मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,देवगड व वैभववाडी तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर अशा चार तालुक्यातील सुमारे ५० ते ६० गावांचे आजी माजी सरपंच व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. खारेपाटण तालुका झालाच पाहिजे या मागणीला व खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी खारेपाटण च्या आजुबाजूच्या गावातील सुमारे १००० पेक्षा अधिक नागरिक यावेळी उपस्थित राहणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.तर खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच या
मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व गाड्यांचे पार्किंग करीता राखीव जागा ठेवण्यात आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत,तंटामुक्ती समिती पोलिस प्रशासन,रोटरी क्लब ऑफ खारेपाटण तसेच सामाजिक मंडळे व संस्था यांचे या मेळाव्यासाठी सहकार्य असणार आहे.
खारेपाटण तालुका झालाच पाहिजे … ! या एकमेव मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक अशा महानिर्धार मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी व खारेपाटण तालुका मागणीला पाठिंबा देण्यासाठी खारेपाटण च्या आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष श्री रामकांत राऊत यांनी केले आहे.

error: Content is protected !!