‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे बांद्यात भीतीचे वातावरण

RRT पथकाच्या हुसकावणीच्या पद्धतीची चौकशी करण्याची मागणी

वन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन

बांदा शहर व परिसरात वावरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीमुळे मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बांदा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे शेतीचे नुकसान होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हत्तीचा पाठलाग करणे, त्याला त्रास देणे, मोठ्या आवाजाने हुसकावणे किंवा अन्य प्रकारे चिथावणी देणे टाळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, वन विभागाच्या RRT पथकाकडून हत्तीला हुसकावण्यासाठी पेटत्या मशाली तसेच स्फोटक अथवा बॉम्बसदृश वस्तूंचा वापर केल्याचे दर्शविणारे व्हिडिओ निदर्शनास आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या व्हिडिओंची सत्यता, घटनास्थळ, सहभागी व्यक्ती, तसेच संबंधित कारवाईला देण्यात आलेले आदेश यांची अधिकृत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हत्तीला अशा पद्धतीने घाबरवल्यास तो अधिक बिथरण्याची आणि मानवी वस्तीकडे धाव घेण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिक, शेतकरी, वन कर्मचारी तसेच हत्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
‘ओंकार’ हत्तीच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षित व वैज्ञानिक कृती आराखडा तयार करावा, हत्तीला चिथावणी देणाऱ्या किंवा धोकादायक पद्धती तात्काळ थांबवाव्यात आणि प्रशिक्षित वन अधिकारी, वन्यजीव तज्ज्ञ व पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीला योग्य व सुरक्षित अधिवासात स्थलांतरित करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच हत्तीच्या जवळ जाऊ नये, त्याचा पाठलाग करू नये अथवा त्याला चिथावणी देऊ नये, याबाबत ग्रामपातळीवर जनजागृती करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास अथवा अधिकृत पथकाच्या कारवाईमुळे परिस्थिती चिघळल्यास उद्भवणाऱ्या जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन देतेवेळी अभिजित सिनारी, डॉ प्रसाद धुमक, ऋषीकेश हरमळकर, श्रीकृष्ण शिरोडकर, चिन्मय सिनारी उपस्थित होते. दरम्यान निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत, भाग्यश्री परब आणि संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही प्रत देण्यात आली आहे. वन विभागाने निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!