कर्ली आणि कालावल खाडीतील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादी (अजितदादा गट) जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची माहिती
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : राज्याचे बंदर तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली व कालावल खाडीतील वाळू लिलावास एमएमबीने परवानगी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
काका कुडाळकर यांनी म्हटले आहे, यावर्षी नवीन शासनाच्या धोरणानुसार या भागात वाळू मिळणं मुश्कील झालं होतं. आणि त्यामुळे एमएमबीने या दोन्ही खाडीतील वाळू उत्खननास सर्वे करून परवानगी दिली नव्हती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व आम्ही सर्वप्रथम प्रांत ऐश्वर्या काळूशे मॅडम यांना भेटून या भागातील वाळू लिलाव लवकरात लवकर करावा अशा प्रकारचे निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्गच्या वतीने मी स्वतः राज्याचे बंदरे ,युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे साहेब यांची २२ नोव्हेंबर २०२३ रोजी भेट घेऊन निवेदनाद्वारे या ठिकाणी वाळू लिलाव होणे आणि अधिकृतरित्या जनतेला वाळू मिळावी यासाठी पत्र दिले होते. . याचवेळी माननीय मंत्री महोदयांनी संबंधित खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत उचित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज एमएमबीच्या हायड्रोग्राफर याने माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना या दोन्ही खाडी मधील वाळू उत्खनन करण्याबाबत अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही कर्ली व कालावल खाडीमध्ये वाळू लिलावाची प्रक्रिया होऊन जनतेस अधिकृतरित्या वाळू मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्ह्याच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याबद्दल मंत्री महोदय श्री संजयजी बनसोडे साहेब यांना यांचे काका कुडाळकर यांनी आभार मानले आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.