प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु – धनंजय मुंडे

आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप
मुंबई – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत ९६५ कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्यमंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली. त्याचबरोबर बैठकीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता १२ जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून ९ जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्यस्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा ९ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ १ रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण ८ हजार १६ कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.
राज्यात ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या ८६ टक्के पाऊस (९२८.८ मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी ५८ लाख ७६ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी याच सुमारास १३ लाख ५० हेक्टर पेरणी झाली होती. यावर्षी १५ लाख ११ हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून १७ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या ४५ टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २१.५२ लाख हेक्टर असून यावर्षी ५.६४ लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या २६ टक्के पेरणी झाली आहे.





