36 वर्षाच्या सक्रिय राजकीय वाटचालीनंतर राजू शेट्ये यांचा राजकारणातून संन्यास

शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदी होते कार्यरत

राजु शेट्ये यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत पत्रकात त्यांनी म्हटले आहे, मी १९८७ साली मा.प्रि.वामनराव महाडिक यांच्या उपस्थितीत वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला, तो सुद्धा राजापूर तालुक्यात. त्यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. मात्र मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या “शिवसेना” या चार अक्षरावर आजतगात ठाम राहिलो. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आज पर्यंत कोणाच्याही मोहाला बळी न पडता संघटनेत कायम सक्रिय राहिलो. मुंबई, ठाणे येथेही पक्षाचे काम करण्याची संधी मिळाली. तेथही कायम कार्यरत राहिलो. या कालावधीत संघटने जी जबाबदारी माझ्याकडे सोपवली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. मा. नारायण राणे हे २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये गेले, त्यावेळी सुद्धा मा. जिजी उपरकर यांच्या सोबत जीवाची पर्वा न करता संपूर्ण जिल्हाभर फिरलो. कोणतीही निवडणूक असो, निष्ठांवंत शिवसैनिक म्हणून कोणतीही अपेक्षा न करता काम केले. खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे निवडून येण्यासाठी रात्रंदिवस काम करून जीवाचे रान केले. पक्षासाठी वेळ प्रसंगी अंगावर केसेसही घेतल्या. कणकवलीत झालेल्या आमने सामनेच्या वेळी रक्तही सांडवले. संघटनेच्या माध्यमातून साजरे होणारे नवरात्र उत्सव असो, शिवाजी महाराज जयंती असो, किंवा पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो, कधीही मागे राहिलो नाही. पक्षाने माझी कार्यशैली पद्धत पाहून संघटनेचे शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपजिल्हाप्रमुख अश्या पदावर नेमणूक केली. या सर्वं पदांवर निस्वार्थी व प्रामाणिकपणे काम केले. याचं कालावधीत मा. अप्पा पराडकर यांनी हिंद कामगार सेनेच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देवून माझा गौरव केला. कोरोना सारख्या आजाराने जगात थैमान घातलेले असताना अश्या परिस्थितीत सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्य जनेतेला मदत केली. त्या काळात गरजू पेशन्ट करिता जे शक्य होईल तेवढे प्रयत्न केले व त्यांच्यासाठी तातडीने धावून गेलो. पक्षाचे काम करत असताना मा. विनायक राऊत, आम. वैभव नाईक, जिल्हासंपर्कप्रमुख मा. अरुण दुधवडकर, श्री संजय पडते, जिल्हा प्रमुख मा. संदेश पारकर, मा. सतीश सावंत तसेच मा. आप्पा पराडकर यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. या सोबत जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व तमाम शिवसैनिक यांचे कायम सहकार्य मिळाले.
या काळात माझ्या कुटुंबाकडे कधीच लक्ष देता आले नाही. मात्र मी जे सामाजिक, राजकीय कार्य करत होतो, त्याला माझी आई, पत्नी, तसेच माझ्या कुटूंबातील अविभाज्य घटक म्हणून राहिलेले माझे जेष्ठ मामा श्री मोहन हुले यांनी मला नेहमीच साथ दिली. परंतु आता माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे आणि माझ्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय संन्यास जाहीर करत आहे. संन्यास घेण्यामागे माझी कोणावरही नाराजी नाही किंवा कोणावर रोष, राग नाही. गेल्या ३६ वर्षात माझ्याकडून कोणाचेही मन दुखावलं असेल, तर कृपया मला माफ करावे. माझ्यावर असेच प्रेम व आशिर्वाद कायम ठेवा. मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मात्र मी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मरेपर्यंत तुमच्या सोबत कायम राहणार. असे श्री शेट्टी यांनी या पत्रकात म्हटले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!