धगधगत्या मशालींनी उजळला किल्ले रायगड

श्री शिवचैतन्य सोहळ्यासाठी शेकडो मावळे रायगडावर
प्रतिनिधी । कुडाळ : श्री शिवचैतन्य सोहळ्याच्या निमित्ताने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला धगधगत्या मशालीनीं, उजळला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त पारंपारिक वेषात किल्ले रायगडावर उपस्थित होते.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड तर्फे आयोजित करण्यात येणारा श्री शिवचैतन्य सोहळा या वर्षी गोवत्स द्वादशी, वसुबारस (गुरुवार दिनांक, ९ नोव्हेंबर २०२३) च्या संध्येला मोठ्या आनंदाने व उत्साहाने किल्ले रायगडावर पार पडला. . यंदाचे या सोहळ्याचे १२ वे वर्ष होते. . या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त पारंपारिक वेषात किल्ले रायगडावर उपस्थित होते.
या सोहळ्याचे महत्व असे कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करत आहोत, परंतु आपल्या या राजाचा गड स्वराज्याची राजधानी मात्र ऐन दिवाळीत अंधारात असते. हे शल्य जाणून समितीचे मावळे दिवाळी सणाचा पहिला दिवा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी लावतात आणि आपल्या दिवाळी सणाची सुरुवात करतात असे या समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार यांनी या प्रसंगी सांगितले.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकाचे ३५० वे वर्ष असल्यामुळे यंदा ३५० मशाली प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. दिवाळीच्या अनुषंगाने गडावरील श्री जगदीश्वर, शिरकाई देवी, व्याडेश्वर व इतर सर्व देवीदेवतांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, मशालींच्या उजेडात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. मावळ्यांच्या वेशातील धारकरी, नववारी नेसलेल्या भगिनी, ढोल ताशांचा गजर, पणत्यांनी उजळलेला रायगड, धगधगत्या मशाली यांनी गडावरील वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. दिवाळी सणानिमित्त गडावरील रहिवाशांना फराळाचे वाटप समितीमार्फत करण्यात आले.
रायगडावर सुद्धा भव्य प्रकाशयोजना शासनामार्फत करण्यात यावी – श्री वारेकर
दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक वास्तूंवर शासनामार्फत प्रकाशयोजना करण्यात येते, परंतु स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगडावर अशी कोणतीही प्रकाशयोजना करण्यात येत नाही. त्यामुळे दिवाळी सणात रायगड किल्ला अंधारात असतो. या कारणास्तव दिवाळी व इतर महत्वाच्या दिवशी रायगडावर सुद्धा भव्य प्रकाशयोजना शासनामार्फत करण्यात यावी, अशी मागणी समितीच्यावतीने महाराष्ट्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सरचिटणीस समीर वारेकर यांनी सोहळ्यानंतर दिली. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दुर्गशृष्टि प्रतिष्ठान (विक्रोळी), राजमुद्रा हायकर्स (बदलापूर) व आम्ही मावळे (बोरीवली) यांचे सहकार्य लाभले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





