सहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निलेश जोशी । कुडाळ : रक्तदान ही सामाजिक चळवळ आहे. रक्तदानाने दुसऱ्याला जीवदान दिले जाते आणि रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय कुडाळच्या प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ प्राची तनपुरे यांनी केले. कुडाळ येथे आज सिध्दाई डान्स अकॅडमीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात त्या बोलत होत्या. शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
सिध्दाई डान्स अकॅडमी कुडाळच्या वतीने युवा डान्स कोरिओग्राफर विधन परवार याच्या स्मरणार्थ त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सिध्दाई डान्स अकॅडमी येथे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ तनपुरे, पत्रकार अजय सावंत, मराठा समाजाच्या महिल्या पदाधिकारी अदिती सावंत, जेष्ठ नागरिक मोहन राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंड्या सावंत, सिध्दाई डान्स अकॅडमीच्या संचालिका कविता राऊळ, सागर आजगावकर, सचिन कोंडसकर, महेश राऊळ, इंद्रजित माने ,आबा अहिर, गौरेश कुडाळकर, सतीश म्हसकर, सागर कदम, सावन जळवी, ईश्वरी राऊळ, जान्हवी ठाकूर, कलिका तेंडोलकर, शिवानी आचरेकर, योगेश आचरेकर, जिल्हा रक्तपेढीचे डॉ अभिजीत इगे, मयुरी शिंदे, नंदकुमार आडकर ,सुरेश डोगरे, विलास पाटील रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ तनपुरे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात वाटचाल करताना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अपघात, इतर घटना झाल्यानंतर गंभीर रुग्णाला रक्ताची गरज असते. ती गरज आपण रक्तदान या सामाजिक उपक्रमातून पूर्ण करतो. दुसऱ्याला जीवदान देण्याचे काम रक्तदाता करत असतो. रक्तदान ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी या सामाजिक उपक्रमात सर्वाचा सहभाग महत्वाचा आहे असे सांगितले.
पत्रकार अजय सावंत यांनी सांगितले की, सिंधुदूर्ग जिल्ह्यात बरेच डान्स अकॅडमी आहेत. अकॅडमी म्हटले की सांस्कृतिक कार्यक्रम आले. मात्र सिध्दाइने सांस्कृतिक कार्यक्रम घेतानाच प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित असणारा रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रास्ताविकात सचिन कोंडस्कर यांनी विधन या युवा डान्स कोरिओग्राफरचे अकरा महिन्यापूर्वी भीषण अपघाती निधन झाले होते त्याचे निधन हे सर्वासाठी धक्कादायक होते. तो सिध्दाई डान्स अकॅडमीचा महत्वाचा सदस्य होता. आज धकाधकीच्या जीवनात वाटचाल करताना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. रक्तदान करून दुसऱ्याला जीवदान देणे ही सामाजिक बांधिलकी जोपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,असे सांगितले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





