सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाची सांगता

सिंधुदुर्ग पोलीस आणि एमकेसीएलचा उपक्रम
२५८ शाळा आणि ५० हजार विद्यार्थ्यांमध्ये केली जनजागृती
निलेश जोशी । कुडाळ : सायबर गुन्हाबाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. १४ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर पर्यंत आम्ही जिल्ह्यातील २५८ शाळांमध्ये उपक्रम घेतले. या उपक्रमादरम्यान सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. सायबर गुन्हे कमी होणे ही काळाची गरत आहे. त्यासाठी आमची पोलिस यंत्रणा जनजागृतीची ही मोहिम भविष्यातही चालु ठेवणार आहे. जनतेनेही आम्हाला साथ द्यावी. असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. दरम्यान सायबर गुन्ह्यातील प्रत्येक आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे त्या दृष्टिने आमचे प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग पोलीस सायबर सुरक्षा जनजागृती अभियान, सांगता समारंभ कुडाळ येथील मराठा हॉल येथे शुक्रवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलिस अधीक्षक, एमकेसीएल व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, एमकेसीएलचे जिल्हा प्रतिनिधी प्रणय तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे, कुडाळ हायस्कूलचे संचालक अनंत वैद्य, रोटरी क्लबचे राजन बोबाटे, लायन्स क्लबचे प्रतिनीधी अॅड.अजित भणगे, कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, सायबरसेलचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदि उपस्थित होते.
यावेळी प्रणय तेली म्हणाले की, अलिकडे सायबर गुन्हे वाढले आहेत, ही धोक्याची घंटा आहे.त्यामुळे सर्वांनी सावध होणे आवश्यक असुन त्यासाठी काय करावे? काय करू नये याबाबत उपस्थितांना मोलाच्या टिप्स दिल्या. तसेच प्रत्येक व्यक्ती दिवसभरात किती तास मोबाईल वापरतो त्या वापरा दरम्यान अनावधानाने काय घडु शकतं? ते टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग राहावे असे आवाहन केले.
यावेळी श्री. हुदळेकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर गुन्हे कमी पण सायबर गुन्हे वाढत चालले आहेत ही चिंतेची बाब आहे, म्हणुनच नागरीकांमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी जिल्ह्यात २५० हुन अधिक हायस्कूल व कॉलेज मध्ये जनजागृतीची ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विद्यालयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त पाठिंबा दिला असल्याचे श्री.हुंदळेकर यांनी सांगितले. यावेळी . शाळा प्रतिनीधी वैभव खानोलकर,साध्वी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाभरातील पोलिस अधिकारी, शाळा संस्थानचे प्रतिनिधी, विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कुडाळ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सायबर सुरक्षेबाबत शपथ वाचन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन हुदळेकर यांनी करून शेवटी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सदिप भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





