दशावतार लोककलेला पुढे नेण्याची गरज – विजय चव्हाण

‘माझा लोकराजा’ महोत्सवात मान्यवरांचा सत्कार
निलेश जोशी । कुडाळ : तुम्ही सर्व रंगमचाचे कलाकार आहात. आपण कोणासमोर झुकायचे नाही तर दुसऱ्याला झुकायला लावायचे आहे. दशावतार लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी राजकिय शक्तींना झुकायला लाऊया. आपल्या लाल मातीतल्या दशावतार लोककलेला आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ रंगकर्मी, सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले. कुडाळ आज माझा लोकराजा महोत्सवात ते बोलत होते.
कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटनेच्या वतीने दशावतारातील दिग्गज दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी “माझा लोकराजा महोत्सव” चे आयोजन कुडाळ येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, अतुल बंगे, पखवाज अलंकार महेश सावंत, लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका) तेंडोलकर, तुकाराम (अण्णा) गावडे, राधाकृष्ण (बाबली) नाईक, सिद्धेश कलिंगण, दशावतारी कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कोचरेकर, भजनी बुवा अभिषेक शिरसाट, उद्योजक कृष्णा धुरी, नेरूरचे माजी सरपंच शेखर गावडे, विस्तार अधिकारी आनंद कुंभार, खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक बाबा मेस्त्री, श्रीमती शुभांगी सुधीर कलिंगण, सौरभ पाटकर, अमोल राणे, अॅड.पी.डी.देसाई, कलाकार बहुउद्देशिय संघटना तालुकाध्यक्ष चारूदत्त तेंडोलकर, सचिव निळकंठ सावंत, उपाध्यक्ष ओंकार सावंत, सल्लागार मोरेश्वर सावंत, दादा राणे – कोनसकर, सुधीर तांडेल, श्री.बागवे, दिपक भोगटे, यतीन सामंत, पंकज कलिंगण,श्री.आजगांवकर, शरद नाईक, दिनेश गोरे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, दशावतारी कलाकार, चालक, मालक, लाजरी क्रिकेट ग्रुपचे सदस्य व नाट्यरसिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले मी कालपर्यंत प्रशासन चौकटीत होतो. आजपासून एक रंगकर्मी व रंगमंचाचा सेवक म्हणून काम करत आहे. तुमच्यातील मी एक कलाकार आहे. आज माझ्या सेवानिृवृत्तीनंतर पहिला दिवस सांस्कृतिक अशा चागल्या कार्याने सुरुवात होत आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात अनेक कार्यक्रम केले. कुडाळ तालुक्यात २७ नाट्यमंडळे आहेत तर जिल्ह्यात १७४ नाट्यमंडळे कार्यरत आहेत. या सर्व मंडळांना या हॉलमध्ये एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आपली दशावतार लोककला फार मोठी ठेव आहे, मोठा खजिना आहे असे सांगत मी सदैव तुमच्या सोबत आहे असे सांगितले. पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, गावागावात मनोरंजनाचे माध्यम हे दशावतार लोककला होती आणि आजही आहे. त्यावेळी मी लोकराजा सुधीर कलिगण हा ५ वर्षाचा असताना लवकुंश नाटक पाहिले. त्यावेळपासुन हा लोकराजा सर्वसामान्याच्या मनावर अधिराज्य गाजविले त्याच्या मुलांनी त्यांचा वारसा उचलला आहे असे सागितले आहे.
भजनीबुवा केळुसकर म्हणाले, न्याय्य हक्कांसाठी लढा द्यायचा असेल तर संघटीत होणे काळाची गरज आहे आपल्यामध्ये वाद असेल तर तो बाजूला ठेवून एकत्र या असे सांगत संघटना मजबूतीतून आपली ताकद दाखवा. असे आवाहन केले. अतुल बंगे यांनी सुध्दा दशावतार कलेबाबत आपले बहुमोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात मोरेश्वर सावंत यांनी कुडाळ तालुक्यात दशावतार कलाकार एका छत्राखाली आले पाहिजेत या उदात्त हेतूने कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुउद्धेशीय संघटना स्थापन करण्यात आली संघटनेचा हा पहिलाच माझा लोकराजा महोत्सव असून या महोत्सवातून लोकराजा कै सुधीर कलिंगण यांच्या आठवणींना उजाळा देणे हा उद्देश आहे. विशेष म्हणजे लाजरी ग्रूप कुडाळने या दशावतार लोककलेला संयुक्त दशावतार लोककलेचे स्वरूप दिले. या कलेला गेली कित्येक वर्षे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे आमच्या दशावतार लोककलेला लोकाश्रय मिळाला मात्र अजून राजाश्रय मिळाला नाही. आम्हाला जोपर्यत राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत आमचा शासन दरबारी लढा सुरूच राहणार असे सांगितले. तालुक्यातील दशावतारातील ज्येष्ठ कलाकार आणि दशावतारी मंडळ मालक – संचालकांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर श्री देव कलेश्वर दशावतार (सुधीर कलिंगण प्रस्तुत) मंडळाचा नाट्यप्रयोग सादर झाला.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





