शिक्षकी पेशा व्रत म्हणून स्वीकारा – अमोल पाठक

निलेश जोशी । कुडाळ : शिक्षक पेशा एक व्रत म्हणून स्वीकारा. त्यासाठी चाकोरीबद्ध वृत्तीमध्ये अमुलाग्र बदल अपेक्षित आहे. ज्ञानाशिवाय बदल घडू शकत नाही.या  ज्ञानाला कौशल्याची जोडही देणे महत्त्वाचे आहे .बौद्धिक उन्नती बरोबर शारीरिक सुदृढता राखण्यासाठी या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून सुसह्य जीवन जगण्यासाठी  योगाचे ज्ञान व त्याचा सराव शरीर व मनाच्या निरोगीपणाकडे घेऊन जाईल. असे उद्गार कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी काढले.
    बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योग शिक्षक पदविका शिक्षणक्रमचे  उद्घाटन आणि  एम ए एज्युकेशन व शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षण क्रमातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात श्री. पाठक  अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 
    दीप प्रज्ज्वलन व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केल्यानंतर आयोजकांतर्फे उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बॅ.नाथ  पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर ,बॅ नाथ पै बी.एड कॉलेज चे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख परेश धावडे, केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर ,महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या डॉ प्रगती शेटकर ,योग प्रशिक्षक प्रा.रिद्धी पाताडे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर , समंत्रक प्रा.डॉ. मनोज रेडकर ,प्रा नागेश कदम,प्रा.डॉ.संदीप पवार इत्यादी उपस्थित होते
.   यावेळी बोलताना अमोल पाठक पुढे म्हणले,  नवीन शैक्षणिक धोरण हे बदलत्या काळाची गरज आहे. त्यासाठी शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी त्याचा सूक्ष्म अभ्यास करून नियोजनबद्धपणे या धोरणाचा अवलंब केला तर भावी पिढी अधिक सक्षम व समर्थ व ज्ञानवंत होऊ शकते.  उमेश गाळणकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कला आणि कौशल्युक्त योगशिक्षक पदविका शिक्षणक्रम सुरू करून समाजाच्या औषध मुक्त निरोगी जीवनासाठी जे पाऊल टाकलेले आहे. त्यासाठी आपल्या शुभेच्च्छा असल्याचे  सांगितले. 
     प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शालेय शिक्षण मंत्र्यांचे स्विय सहाय्यक रामचंद्र आंगणे यांनी आपल्या मनोगतामध्ये “निरोगी शरीरामध्ये सुदृढ, निरोगी मन वास करत असते. याचा विचार करत आपल्या शारीरिक आरोग्याला योगाची जोड दिल्यास शरीराबरोबर निरोगी मन हे प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकते याचे ज्ञान घ्या .यासाठी योगशिक्षक पदविका हा एक सुंदर शिक्षणक्रम बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा लाभ घ्या आणि आपण येथे ज्या ज्या क्षेत्रात असू तेथील लोकांना योग कलेमार्फत निरोगी आयुष्याचा  मूलमंत्र द्या. असे आवाहन केले.व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
   संस्था चेअरमन उमेश गाळवणकर म्हणाले,  शिक्षण ही एक अविरत चालणारे प्रक्रिया आहे. त्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये असलेल्या व्यक्तीने त्याचे भान ठेवून आपले ज्ञान अपडेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी एम ए एज्युकेशन, शालेय व्यवस्थापन हे शिक्षणक्रम महत्त्वपूर्ण आहेत. ते कुठे घ्यावेत हा जो शिक्षकांसमोर प्रश्न पडतो त्याची कमतरता भरून काढण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने आपल्या जिल्ह्यामध्ये हे शिक्षणक्रम आणले.  त्याचा शिक्षकांनी लाभ घ्यावा. योग पदविका शिक्षणक्रमाबद्दल बोलताना त्यांनी “शरीर मनाच्या आरोग्यासाठी योगाची महती आता जगाला पटलेली आहे. याचं शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे या उद्देशाने बॅ नाथ पै  बीएड केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा  योगशिक्षक पदविका शिक्षणक्रम सुरू केलेला आहे व त्याचा एक उत्तम दर्जा राखलेला आहे. त्याचा त्या पद्धतीने लाभ घ्यावा. असे त्यांनी आवाहन केले.
    डॉ दिपाली  काजरेकर यांनी  बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर त्यांची शिक्षणाबद्दलची असलेली आस्था व नवनवीन अभ्यासक्रम या स्थानिकाला उपलब्ध करून देण्याची तळमळ याची मुक्तकंठाने स्तुती करत एम एज्युकेशन व शालेय व्यवस्थापन पदविकाधारक शिक्षकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या व योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचा समाजाच्या निरोगी आयुष्यासाठी वापर करावा. असे आवाहन केले.
  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे केंद्रप्रमुख परेश धावडे यांनी सुद्धा या शिक्षणक्रमांचे  व योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व उपस्थितांना विशद करून शिक्षण संस्थेने जो शिक्षणक्रम येथे आणलेला आहे; त्याचा  उत्तम पद्धतीने लाभ घ्यावा.असे सांगत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले जाईल असं अभिवचन दिले.
       यावेळी एम ए एज्युकेशन शिक्षणक्रमां मधील गुणवंत विद्यार्थी शैलजा सचिन परळकर प्रथम, जोत्स्ना संदीप गावडे द्वितीय, प्रेरणा प्रवीण गावकर तृतीय ,विलास सिताराम राठोड ,राजेश प्रभाकर आव्हाड, दिपाली अच्युत पिळणकर तसेच शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे प्रदीप प्रभाकर सावंत  प्रथम, बाळाराम गोविंद सामंत प्रथम नेहा सुनील काळसेकर द्वितीय, व चंद्रशेखर गणपत बर्वे तृतीय, क्रमांक प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बी.एड.  प्रथम वर्ष व बीएड द्वितीय वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन   सत्कार करण्यात आला.
  एम ए एज्युकेशन व शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांतर्फे अविनाश पारखे, सुषमा मांजरेकर, चंद्रशेखर बर्वे, विलास राठोड, प्रेरणा गावकर यांनी मनोगत व्यक्त करताना ‘या अभ्यासक्रमामुळे आपल्याला आपली शैक्षणिक पात्रता वाढवता आली.असे सांगितले.  बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
     कार्यक्रमाची सुरुवात बीएड विद्यार्थिनींनी गायलेल्या ईश स्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितीन बांबर्डेकर यांनी,सूत्रसंचालन बी.एड प्राध्यापिका सौ योगिता शिरसाट यांनी केले तर उपस्थिताचे आभार प्रा अरुण मर्गज यांनी मांनले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!