महावितरणची गो ग्रीन सेवा यशस्वी दिशेने

ग्राहकांची वार्षिक १० लाखांची बचत
सिंधुदुर्ग : “कागद वाचवा-पैसेही वाचवा” महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीजबिलाऐवजी नोंदणीकृत ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. गो ग्रीन सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना दरमहा वीज बिलात १० रुपयांची सवलत दिली जाते. गो ग्रीन द्वारे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार ५८१ वीज ग्राहक वार्षिक १० लाख २९ हजार ७२० रुपयांची आर्थिक बचत करीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार २४० तर सिंधुदुर्गच्या ३ हजार ३४१ वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी केली आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकास दरमहा १० रुपये सवलतीप्रमाणे एका ग्राहकाचे वार्षिक १२० रुपये बचत होतात. वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेकरिता नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या लिंकचा वापर करावा. या लिंकवर आपल्या वीज ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट आधारे ई-मेल आयडी व छापिल वीज बिलाच्या डाव्या कोपऱ्यात चौकटीत दिलेला १५ अंकी बिल नं/गो ग्रीन क्रमांक (जीजीएन) नोंदवून सेवेची निवड करावी. त्यानंतर गो ग्रीन सेवा नोंदणी पूर्ण करण्यासाठी आपल्या ई- मेलवर आलेल्या लिंकवर खात्री करा. वीजग्राहक नजीकच्या महावितरण कार्यालयात जाऊन गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करू शकतात. तरी वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
सिंधुदुर्ग / कोकण नाऊ / प्रतिनिधी