एस एम जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व जागरूकता उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि एमकेसीएल सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेक्युरिटी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली पोलीस स्टेशन कणकवली व एमकेसीएल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व दैनंदिन जीवनातील जागरूकता मार्गदर्शनचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.शेडगे साहेब, एस एम ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री जी एन बोडके, उपप्राचार्य श्री आर एल प्रधान, पर्यवेक्षक श्री जी ए कदम यांच्यासह आयडीयल कॉम्प्युटर सेंटरच्या गायकवाड मॅडम, मधुरा कॉम्प्युटरच्या बाईत मॅडम, प्रतिमा कॉम्प्युटरचे मोरे सर, ज्ञानकुंज कॉम्प्युटरचे मानसपुरे सर, वेदांत कॉम्प्युटरचे मालप सर, परफेक्ट कॉम्प्युटरचे घाडीगावकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये प्राचार्य श्री जी एन बोडके यांनी मान्यवरांचे स्वागत करत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि सातत्याने असे मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कणकवली शिक्षण संस्था कणकवलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सध्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जगाचा उपभोग घेणारा सगळ्यात मोठा वर्ग म्हणजे तरुणाई आणि सायबर क्राईम मध्ये अडकणारी देखील तरुणाईच. या तरुणाईला इंटरनेट वापरताना किंवा मोबाईल वापरताना कोण कोणती काळजी घ्यावी?यामध्ये प्रामुख्याने पासवर्ड, प्रोफाइल सेटिंग, फेक मेसेज, व्हिडिओ, फोटो ऑनलाइन पेमेंट अशा विविध क्राईमबाबत कशी काळजी घ्यावी याचे सोप्या शब्दात पोलीस उपनिरीक्षक श्री शेगडे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
त्याबरोबरच मधुरा कॉम्प्युटरच्या बाईत मॅडम आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाइन गेममधून होणारी फसवणूक,आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून होणारी फसवणूक, मोबाईलच्या आहारी जाऊन स्वतःच्याच पालकांची केली जाणारी फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांच्या भावनेला हात घालत तरुणाईला जागृत केले.
तरुणांसाठी अतिशय उपयोगी मार्गदर्शन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एम आर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री व्ही आर गायकवाड यांनी मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण