सावंतवाडी “ट्रॅप” मुळे सिंधुदुर्ग लाचलुचपत उपविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !

मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांची टीका
प्रतिनिधी । कुडाळ : सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना रायगड लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्हाच्या पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी वैभववाडी येथे देखील ठाणे लाचलुचपत विभागाने अशा पद्धतीची कारवाई केली होती. मात्र या दोन्ही कारवायांमुळे सिंधुदुर्ग लाचलुचपत उपविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील लाचलुचपत विभाग कार्यालय फक्त “नाव मोठे लक्षण खोटे” अशाप्रकारे असल्याची प्रचिती मिळाल्याची चर्चा जिल्ह्यातील जनतेत आहे, अशी टीका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. गावडे पुढे म्हणतात, जिल्ह्यात लाचलुचपत विभागामार्फत फक्त तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा कर्मचाऱ्यांवरच कारवाई होताना दिसते. मात्र पोलीस, महसूल, बांधकाम,शिक्षण अशा विभागातील भ्रष्टाचारी मोठे मासे गळाला कधीच का लागत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित होतो. भ्रष्टाचाराने त्रस्त पीडित स्थानिक जनता लाचलुचपतच्या ठाणे,रायगड कार्यालयाकडे आपली व्यथा मांडतात, याचाच अर्थ जनतेचा जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विश्वास राहिला नाही असेच यावरून सिद्ध होते. स्थानिक जनतेची मोठ्या माशांकडून राजरोसपणे पिळवणूक चालू असून लाचलुचपत विभागाच्या जिल्ह्यातील कार्यालयाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खोचक टीका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.