लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विनायक राऊत यांना निवडून आणायचे असेल तर सावंतवाडी विधानसभेची जागा त्यांनी राष्ट्रवादीला सोडावी

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यानी व्यक्त केलं मत
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सावंतवाडीत अर्चना घारेंनाच संधी द्यावी
सावंतवाडी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विनायक राऊत यांना निवडून आणायचे असेल तर सावंतवाडी विधानसभेची जागा त्यांनी राष्ट्रवादीला सोडावी. आता फक्त आम्ही लाचारी करणार नाही, झेंडे उचलणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे दिला. दरम्यान या
ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सावंतवाडीत अर्चना घारेंनाच संधी द्यावी, आणि ती संधी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हवा तर तो बालहट्ट समजा पण आम्हाला न्याय द्या, अशी त्यांनी पाटीलांसमोर “गळ” घातली. राष्ट्रवादीचे नेते तथा कोकण निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीत आहोत. परंतु खासदार आमचा, त्यामुळे लोकसभेसह जिल्ह्यातील तीनही विधानसभा आम्हीच लढवणार, असे सांगून शिवसेनेकडून आमचे खच्चीकरण केले जात आहे. पक्ष फुटीनंतर प्रामाणिकपणे संघटना वाढवण्याचे
काम आमच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे काही झाले तरी त्यांना न्याय मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मित्र पक्षांकडून पाहिजे इतके सहकार्य होताना दिसत नाही. लोकसभा आम्हीच लढवणार आणि तीनही विधानसभा आम्हीच लढणार, असे सांगून शिवसेनेकडून आमचे खच्चीकरण केले जात आहेत. त्यामुळे जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेत विनायक राऊत यांना निवडून द्यायचे असेल तर सावंतवाडीत जागा आम्हाला सोडावीच लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.तसेच येणाऱ्या काळात आम्ही पक्ष संघटना बांधणीसाठी प्रयत्न करत आहोत. असे यावेळी ते बोलत होते. या सभेला उस्फुर्त प्रतिसाद यावेळी लाभला.