कुडाळात गणेशोत्सवात वाहतुकीचे उत्तम नियोजन

कुडाळ व्यापारी संघटनेने मानले पोलिसांचे आभार
पोलीस प्रशासन नेहमीच सज्ज – रुणाल मुल्ला
निलेश जोशी । कुडाळ : गणेश चतुर्थी कालावधीत कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल कुडाळ पोलीस प्रशासनाचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने भेट देत विशेष आभार मानण्यात आले. यावेळी कुडाळ शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच सज्ज असणार आहे. अशी ग्वाही पोलीस प्रशासनाच्या पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी यावेळी दिली.
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. गणेश चतुर्थी कालावधीत कुडाळ शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न महत्त्वाचा असतो. मुंबई व अन्य भागात येणारे चाकरमानी यामुळे शहरात वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. मात्र शहरातील रस्ते अरुंद असल्याने शहरांमध्ये वाहतुक कोंडीचा विषय नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र या काळात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुडाळ पोलीस प्रशासनाने मुख्य चौका चौकात व रहदारीच्या ठिकाणी पोलीस तसेच होमगार्ड कर्मचारी तैनात करून वाहतूक कोंडीच्या विषयाला चांगलाच लगाम लावला. गणेशोत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी असूनही व शहरातील रस्ते अरुंद असुनही पोलिस प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे यावर्षी शहरात वाहतूक कोंडीचा विषय तसा विशेष जाणवला नाही. पोलीस प्रशासनाच्या या चांगल्या कामगिरीची दखल घेत कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने कुडाळ पोलीस प्रशासन व पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली. पोलीस निरीक्षक व व्यापारी संघटना यांची कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी व शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
कुडाळ शहर झपाट्याने वाढत असुन शहर तसेच शहरालगतचा महामार्ग याठिकाणीही अनेक वेळा अपघाताचे प्रसंग निर्माण होतात. शहरातील उद्यमनगर व गुढीपुर येथील मिडलकटमुळे उद्भवणार्या समस्यांबाबत व्यापारी संघटनेच्या वतीने चर्चा करत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी मिडलकट बाबत आपण संबंधितांची वारंवार बैठक घेत हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच याबाबत आपण महामार्ग प्रशासनाच्या वारंवार संपर्कात असुन ही समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने शहरातील अन्य विषयांवर चर्चा करत शहरातील समस्यांबाबत पोलिस प्रशासनाचे वारंवार मिळत असलेल्या सहकार्याबाबत विशेष आभार मानण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनाने शहरातील वाहतुक कोंडी व अन्य विषय हे पोलिस प्रशासनाबरोबरच सर्वांच्याच सहकार्यातुन मार्गी लागत असल्याने यापुढेही आपल्याला सर्वांचेच अशाप्रकारे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोंविद सावंत, माजी जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद शिरसाट, सुनिल भोगटे, राकेश नेमळेकर, स्वरूप वाळके, मिलिंद देसाई तसेच कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्ष सागर शिंदे, श्री. कराडकर व केसरकर पोलिस नितीन कदम आदि. उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.