मासेमारी आणि पर्यटन असे दुहेरी परवाने द्या !

राष्ट्रीय मत्स्य संमेलनात रविकिरण तोरसकर यांची मागणी
निलेश जोशी । कुडाळ : मासेमारी व पर्यटन असे दुहेरी परवाने द्यावेत अशी मागणी पहिल्यांदाच करण्यात आली आहे. वाशी येथे झालेल्या सहकार भारती आयोजित राष्ट्रीय मत्स्यसंमेलनात हि मागणी करण्यात आली असल्याची माहिती निलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरस्कर यांनी दिली.
वाशी येथील विष्णुदास भावे सभागृह येथे शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी सहकार भारती संघटनेने राष्ट्रीय मत्स्य संमेलन आयोजित केले होते .सदर संमेलनास २५ राज्यातील ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये गोडे पाणी ,खारेपाणी तसेच निमखारे पाण्यातील मच्छिमार संघटना व मत्स्य शेतकरी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणात आले होते .एकीकृत मत्स्य पालन विकास या विषयाच्या अनुषंगाने संमेलनात विविध चर्चासत्रे संवाद व तज्ञांचे मार्गदर्शन झाले.
या राष्ट्रीय मत्स्यसंमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मत्स्यव्यवसाय संदर्भात सुरू केलेल्या योजनांचा तसेच गेल्या नऊ वर्षांमध्ये वाढलेल्या आयातीचा उल्लेख करत मत्स्यव्यवसाय मध्ये भारत अग्रेसर असल्याबाबत सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना आपल्या समस्या व सूचना सहकार भारती मार्फत केंद्रीय मत्स्योद्योग मंत्रालयाला अवगत करण्यास सांगितले.
यावेळी देशभरातून आलेल्या विविध प्रतिनिधींनी आपआपले म्हणणे, समस्या याबाबत सूचना केल्या. यामध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एक मच्छीमार दोन परवाने ही संकल्पना रविकिरण तोरसकर यांनी मांडली. केंद्रीय सागरी मत्स्योद्योग धोरण २०१६ च्या अंतर्गत मच्छीमारास मासेमारी तसेच पर्यटन असे दोन परवाने देण्याबाबत तरतूद केली आहे .सदर तरतुदीचा वापर करून त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे जेणेकरून मच्छीमारास मासेमारी बरोबरच पर्यटनातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल अशी भूमिका मांडली. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच मांडण्यात आली.
यावर उपस्थित सहकार भारती राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी ,राष्ट्रीय संयोजक -सहकार भारती- मत्स्यप्रकोष्ट , जयंतीभाई केवट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एक मच्छीमार दोन परवाने या संकल्पनेला उपस्थित मच्छिमार प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार रमेश दादा पाटील ,आमदार गणेश नाईक,आमदार. श्रीमती मंदाताई म्हात्रे महाराष्ट्र फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष रामदास संधे, सहकार भारती मत्स्यप्रकोष्ट महाराष्ट्र संयोजक वासुदेव सुरजुसे ,डॉक्टर विवेक वर्तक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.