कणकवली विधानसभेवर आमचाच उमेदवार निवडून येईल, उमेदवाराचे नाव पक्षप्रमुख देतील!

शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांची कणकवलीत माहिती
“होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न” हे भाजपाच्या आश्वासनांची पोलखोल करणारे अभियान राबवण्याचा निर्णय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणारे “होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न” या अभियानाचे आयोजन केले आहे. ऑक्टोबर महिन्यात 1 ते 12 ऑक्टोबर पर्यंत या विशेष अभियानाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती या अभियानाचे निरीक्षक व शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी दिली. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा कोणीही करू दे या लोकसभेसह कणकवली मतदारसंघात देखील विजय आमचाच होणार असा दावा श्री. खोत यांनी याप्रसंगी केला. कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर आदी उपस्थित होते. काळा पैसा भारतात आणणे, परदेशात पैसा घेऊन पळालेल्या काहींना भारतात परत आणणे यासह आधार लिंक करा बँकेत पैसे जमा होतील, पॅन कार्ड लिंक करा मग अनुदान जमा होईल अशी अनेक कामे करायला लावत जनतेच्या तोंडाला भाजप सरकारने पाने पुसली याचा जाब या अभियानाच्या माध्यमातून गाव, वाडी वस्त्यांमध्ये जाऊन विचारला जाणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे प्रश्न आपण जनतेला विचारा व जनतेला भाजपने दिलेली खोटी आश्वासने मान्य आहेत का? हे विचारून आश्वासनांची आठवण करून द्या. असे आवाहन केले आहे. व अशी फसवणूक करणाऱ्या लोकांना परत तुम्ही निवडून देणार आहात का? असा देखील प्रश्न त्या लोकांना विचारा. असे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील कार्यक्रमांमध्ये मी स्वतः सहभागी होणार आहे अशी माहिती श्री खोत यांनी दिली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे प्राबल्य आहे. त्यामुळे लोकसभेसह सध्या आमच्याजवळ नसलेल्या कणकवली विधानसभेवर देखील आम्ही विजय मिळवणार असा दावा त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे देखील आमच्या जवळ नसलेल्या जागा आम्ही निश्चित मिळवणार मात्र कणकवलीत उमेदवार कोण असणार या प्रश्नाला उत्तर देणे टाळत पक्षप्रमुख निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर / कणकवली