…अखेर संदेश पारकर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जाहीर!

पक्षाकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर
सतीश सावंत कणकवली विधानसभा प्रमुख
गेले अनेक महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदाचा तिढा सुटलेला नसतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी व मालवण या तालुक्यांकरता जिल्हाप्रमुख म्हणून संदेश पारकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे कणकवली विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सध्या कार्यरत असणारे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर अतुल रावराणे हे कणकवली विधानसभेचे संपर्कप्रमुख म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नियुक्त्या शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेले काही महिने शिवसेनेच्या पक्षांतर्गत नियुक्तींचा घोळ सुरू असताना हा घोळ तुर्तास तरी सुटला असून, कणकवली विधानसभे करता संदेश पारकर यांची नियुक्ती लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली