संतोष वायंगणकर लिखित “सेलिब्रिटींचा कोरोना काळ” पुस्तकाचे ९ सप्टेंबर रोजी कणकवलीत प्रकाशन

प्रा.जी. ए.सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

कणकवली तालुका पत्रकार समिती च्या वतीने आयोजन

     ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित आणि कवी अजय कांडर संचलित प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या "सेलिब्रिटींचा कोरोना काळ" या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा शनिवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. कणकवली पंचायत समितीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 

कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.जी. ए.सावंत, प्रांताधिकारी जगदीश कातकर ,कणकवली गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, अभ्यासक, विचारवंत डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रकाशन सोहळ्यास जिल्ह्यावासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत आणि सचिव माणिक सावंत यांनी केले आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य माणूसापासून सेलिब्रेटिंपर्यंत सर्वांचे जगणं मुश्कील झालं. मानसिक स्थितीही बिघडली.असा हा काळ सेलिब्रिटींसाठी कसा होता या पार्श्वभूमीवरचे हे पुस्तक आहे. संतोष वायंगणकर हे ३३ वर्षे कोकणच्या पत्रकारितेत निष्ठेने काम करत आहेत. कोकणातील राजकीय, सामाजिक व्यासंगी पत्रकार अशीही त्यांची ओळख आहे.त्यांनी कोरोना काळात सिने-नाटक- मालिका आदी मनोरंजन क्षेत्रातील कलावंतांशी बातचीत करून ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे वृत्तपत्रीय मालिका लेखन केले.माणूस कोणत्याही स्तरातील असो तो कोरोना काळात हतबल झाला नाही असं झालं नाही. तरीही त्याच्यातील संवेदनशीलता जागरूक राहून त्याने सकारात्मक दृष्टीने आपल्याबरोबर इतरांनाही संदेश देण्याचा सतत प्रयत्न केला, याचे प्रातिनिधिक चित्र म्हणजे ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे लेखन होय. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसाला सेलिब्रिटींचे प्रचंड आकर्षण असते. त्यांच्या जगण्याची कुतूहलता या वर्गाच्या मनात सतत जागृत असते. मात्र जगातील कोणत्याही समूह दुःखात सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस या दोघांच्या वेदनेची नस सारखीच असते किंबहुना अशा काळात सेलिब्रिटीही अधिक सामान्य स्तरावर जगत असतात हेच या लेखनातून अधोरेखित होत आहे. अशा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवार ९ सप्टेंबर रोजी होत आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!