आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे रानभाज्यांचे सेवन : अरुण मर्गज

बॅ. नाथ पै जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भरवले अनोखे रानभाज्या प्रदर्शन
निलेश जोशी । कुडाळ : आपलं आरोग्य टिकवायचे असेल तर आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांचा दैनंदिन आहारात उपयोग केला पाहिजे. जिभेचे चोचले पुरवणारे चटकदार पदार्थ, फास्टफूड हे आपल्या आरोग्याला कधीही पोषक नसतात ;तर त्यांचे सेवन अनारोग्याची नांदी असते. तेव्हा ‘रोग होऊन तो बरा करत बसण्यापेक्षा रोग न होण्याची काळजी ही पारंपरिक रानभाज्यांच्या जीवनातील सेवनामुळे घेतली जाऊ शकते असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै महिला कॉलेजचे प्राचार्य प्रा श्री.अरुण मर्गज यांनी केले. बॅ. नाथ पै ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले होते, त्याच्या उदघाटन प्रसंगी प्रा. अरुण मर्गज बोलत होते.
या रानभाज्या प्रदर्शनाचे उद्घाटन बॅरिस्टर नाथ पै महिला कॉलेजचे प्राचार्य प्रा अरुण मर्गज यांच्या हस्ते झाले. यावेळी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोसकर ,उपप्राचार्य मंदार जोशी, बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे , ज्युनिअर कॉलेजचे प्रा. अक्षय दळवी, प्रा .पूजा मेस्त्री, प्रा . रिद्धी पाताडे, नर्सिंग विभागच्या प्रा. वैशाली ओटवणेकर उपस्थित होते.
कोकणामध्ये आपल्या अवतीभवतीच्या निसर्ग परिसरात मिळणाऱ्या बहुउपयोगी व आरोग्यला पोषक व पूरक असणाऱ्या जवळपास ३५ प्रकारच्या रानभाज्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. तसेच काही रानभाज्यापासून तयार केलेले रुचकर पदार्थही विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी योग्य माहिती देत होते. व आहारातलं त्यांचं महत्त्व प्रतिपादन करत होते. त्यामुळे एका अनोख्या रानभाज्यांची माहिती व परिचय विद्यार्थ्यांना झाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

रानभाज्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात असणारे महत्त्व आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या परिसरात आसपास आढळणाऱ्या भाज्या आणि त्यांचे असलेले आयुर्वेदिक उपयोग यांचे महत्त्व यावेळी विशद केले गेले. आपल्या आजूबाजूला अशा अनेक रानभाज्या असतात. उदाहरणार्थ लाजरी ,शेवगा ,पेवगा, कुरुडू, पिंपळ कुडा, घोटवेल,भारंगी,सुरण,सुरण पाला,कनकीचे कोंब,उंबर,सोनारवेल,कांचन, लाजाळू, ओवा, पेवगा, अळू, माठ,दिंडा, राजगीरा, फागला, गुळवेल, टाकळा, आघाडा, कचरा, शेवग्याचा पाला, यांसारख्या आपल्या परिसरात आढळणाऱ्या अनेक रानभाज्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडल्या होत्या. अनेक रानभाज्या ह्या अनेक विकारांवर औषधी असतात .मधुमेह, मुळव्याध, कर्करोगयांसारख्या आजारांमध्ये या रानभाज्या औषधी ठरतात. त्याचबरोबर या भाज्यांची वैज्ञानिक माहितीआणि औषधी उपयोग हे सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडले होते .
रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक अर्जुन सातोस्कर ,प्रा रिद्धी पाताडे, शिक्षक अक्षय दळवी ,मंदार जोशी, पूजा मेस्त्री यांचे व विविध प्रकारच्या रानभाज्या जमा करून प्रदर्शनामध्ये मांडून त्याची उपस्थितांना योग्य माहिती दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रा. अरुण मर्गज यांनी यावेळी कौतुक केले. वैशाली ओटवणेकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये अशा स्तुत्य उपक्रमाचे विविध शाळांमधून, महाविद्यालयांमधून आयोजन करणे ही काळाची गरज आहे असे सांगत त्याचं आरोग्यविषयक महत्त्वही प्रतिपादन करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनाचा बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ही लाभ घेतला.
निलेश जोशी,कोकण नाऊ, कुडाळ.