‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीचे कुडाळमध्ये उदघाटन

जिल्हयातून फक्त तीन महाविद्यालये सहभागी
सहभाग उदासीनतेबद्दल मान्यवरांनी व्यक्त केली खंत
निलेश जोशी । कुडाळ : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत मानाची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज कुडाळमध्ये सुरुवात झाली. या प्राथमिक फेरीत सिंधुदुर्गातून अवघे तीन संघ सहभागी झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी खंत व्यक्त केली.
आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला मानाचं स्थान आहे. या स्पर्धेच्या कुडाळ-रत्नागिरी केंद्राच्या प्राथमिक फेरीच्या सिंधदुर्गसाठी असलेल्या कुडाळ केंद्रावर सादर होणाऱ्या एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ आज संत राऊळ महाराज महाविद्यलयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहामध्ये झाला. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बाबा वर्दम थियेटर्सच्या अध्यक्ष वर्षा वैद्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सौ. वर्षा वैद्य यांच्यासह स्पर्धेचे परिक्षक जितेंद्र परतुरकर,पुणे, निशिकांत कानिटकर, चिपळूण आणि केदार देसाई, कुडाळ तसच रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरी केंद्राचे समन्वयक अनिल दांडेकर, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास झोडगे आणि महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त प्रदीप पाटसकर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत अभिजित देशपांडे यांनी केले.
केदार सामंत यांनी या स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका आणि पुरषोतम करंडक स्पर्धेविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. १९६३ मध्ये महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांनी हि स्पर्धा पुण्याला सुरु केली. २०१० पासून हि स्पर्धा कोकणसाठी खुली करण्यात आली. त्यांनतर आतापर्यंत हि स्पर्धा रतनागिरी केंद्रावर होत होती. पण यावर्षी आयोजकांनी सिंधुदुर्गच्या स्पर्धकांना सोयीस्कर व्हावे यासाठी कुडाळ केंद्र सुरु केले. पण यंदा या स्पर्धेबाबत जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभागी होण्याबाबत उदासीनता दाखवली असल्याचे श्री. सामंत म्हणाले. आज सिंधुदुर्गातील संघ झाल्यांनतर उद्या २ सप्टेंबर रोजी चिपळूण मध्ये रत्नागिरी येथे या स्पर्धेची पार्थमिक फेरी होणार आहे. त्यांनतर या केंद्राचा निकाल जाहीर होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३ आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ८ असे एकूण ११ संघ सहभागी झाले आहेत. असे श्री. सामंत म्हणाले.
सिंधुदुर्गातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या महाष्ट्रातल्या एका मानाच्या स्पर्धेत सहभागी होता यावं म्हणून यावर्षी चिपळूण सोबतच सिंधुदुर्गातील कुडाळ हे केंद्र प्राथमिक फेरीसाठी देण्यात आले. पण तरीसुद्धा जिल्ह्यातील केवळ तीनच महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होतात हि शरमेची गोष्ट आहे, अशी खंत वर्ष वैद्य यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थी दशेतच अभिनयाचे संस्कार झाले तर ती उद्याच्या अभिनेत्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्ह्णूनच अशा मानाच्या स्पर्धेत जिल्हयातल्या जास्तीतजास्त महाविद्यालयांनी आपल्या मुलांना सहभागी होण्याची संधी द्यावी असे आवाहन सौ. वैद्य यांनी यावेळी केले. तुमच्या कलेमुले तुमची ओळख होते. तुम्ही सर्वांच्या लक्षत राहता असे त्यांनी स्वतःचे उदाहरण देऊन सांगितले.
यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंदूकाका शिरसाट, रंगकर्मी कमलाकर इन्सुलकर, डॉ. संजीव आकेरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्ही. जी. भास्कर, प्रा. संतोष वालावलकर आणि महाविद्यलायचे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन केदार सामंत यांनी केलं. या प्राथमिक फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ निर्मित मुक्ती, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, ओरोस निर्मित धयकालो आणि स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड निर्मित वनपिस या एकांकिका सादर झाल्या. उद्या चिपळूण इथं रत्नागिरी जिल्ह्यातल्या ८ एकांकिका सादर होऊन त्यातून एकूण अकरा एकांकिकांमधून ४ एकांकिका अंतिमसाठी निवडल्या जाणार आहेत. अंतिम फेरी पुण्यात होणार आहे. क.म.शि.प्र. मंडळ, संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि बाबा वर्दम थिएटर्स या तीन संस्थांच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा नाट्य रसिकांना अनुभवता आली.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.