बाहेरून येऊन कपड्याचा सेल लावणाऱ्यांना परवानगी नको !

कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी

आठवडा बाजारादिवशी सुद्धा बाहेरचे कापड व्यापारी नको

नगर पंचायत, बाजार समिती, पोलीस ठाण्यात दिले निवेदन

निलेश जोशी । कुडाळ : सणासुदीच्या व इतर दिवशी बाहेरून सेल लावण्यासाठी येणाऱ्या कापड विक्रेत्यांना, तसेच बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी तालुक्याबाहेरील कापड व्यावसायिकांना परवानगी देऊ नये अशी मागणी कुडाळ मधील स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीला कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. या व्यापाऱ्यांनी आपले निवेदन कुडाळ नगर पंचायत, कुडाळ पोलीस ठाणे, बाजार समिती, व्यापारी संघटना याना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, अगोदरच ऑनलाईन मार्केटिंग मुळे, त्याचप्रमाणे बुधवार बाजार दिवशी बाहेरील जिल्ह्यातून येणारे कापड व्यावसायिक यांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण नसल्यामुळे, आणि दिवसेंदिवस बाजारपेठेत मारवाडी, गुजराती यांचे अतिक्रमण, यामुळे आम्ही स्थानिक कापड व्यापारी या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अगोदरच चिंतेत आहेत. यात सणासुदीच्या तोंडावर आपल्या शहरांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या हॉलमध्ये काही बाहेरून कापड व्यापारी येऊन नगरपंचायतीचे किंवा स्थानिक प्रशासनाचे कोणतीही परवानगी न घेता कपड्यांचा सेल लावतात. खरंतर आम्ही सुद्धा वर्षभर अशा सणासुदीच्या सिझनची वाट पाहत असतो. त्या सिझनच्या अपेक्षनेच आम्ही आमच्या दुकानांमध्ये सुद्धा माल भरतो. परंतु अशावेळी बाहेरून येणाऱ्या कापड व्यापान्याने सेल लावल्यामुळे आमच्या स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यावर खूप मोठा परिणाम होतो. आम्ही आज प्रत्येक व्यापारी बँकांकडून कर्ज घेऊन, गाळे विकत किंवा भाड्याने घेऊन, सर्व प्रकारचे स्थानिक व इतर सरकारचे टॅक्स भरून, विज बिल भरून, काही स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे काम करत असतो. जर तुम्ही अशा ठराविक दिवस शहरामध्ये येऊन व्यापार करणाच्या व्यापान्यांवर जर तुम्ही तुमच्या पद्धतीने नियंत्रण ठेवले नाही तर याचा फटका आमच्या व्यापान्यावर झाला तर स्थानिक लोकांचा रोजगार तर जाईलच त्याचप्रमाणे आमच्यावर सुद्धा कर्जबाजारी होण्याची पाळी येईल.
आज जरी भारतामध्ये कोणत्याही राज्यातल्या कोणताही माणूस भारतामध्ये हवा तिथे व्यापार करू शकतो हे जरी सत्य असले तरी एखाद्याला व्यापार करण्यासाठी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका, यांची सुद्धा परवानगी घेणे आवश्यक असते, त्यामुळे अशा सेल ना परवानगी देणे हे कायद्याने तुमच्या अखत्यारित येत असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण अशा सेलना परवानगी देऊ नये आणि जर परवानगीशिवाय जर असे सेल नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये लागले तर त्याच्यावर आपण नियमाप्रमाणे कारवाई करावी. त्याचप्रमाणे या सेलमध्ये जो माल विक्रीस आणला जातो त्यांचे अधिकृत बिल आहे का किंवा तो माल चोरीचा किंवा अन्य बेकायदेशीर मार्गाने आणला आहे का? त्याशिवाय जे कोणी हे व्यापारी हा माल सेल साठी घेऊन आले आहेत त्यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड सुद्धा तपासण्यात यावे.
यावर कायमस्वरूपी नियंत्रण राहण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने मासिक सभेमध्ये तसा ठराव संमत करावा. त्याचप्रमाणे बुधवार दिवशी फक्त कुडाळ तालुक्यामधील असलेल्या कापड व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी परवानगी द्यावी. जेणेकरून बुधवार दिवशी सुद्धा अशा कापड व्यवसायिकांच्या संख्येवर नियंत्रण राहील. हॉल बाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार सदर हॉल मालकांनी परवाना प्राप्त करताना सादर केलेल्या अर्जांची त्यामधे नमूद कोणत्या कारणासाठी तो परवाना वापर केला जाईल या दृष्टिकोनातून छाननी करण्यात यावी. कारण त्यांना दिलेल्या परवानगी मध्ये आपण असे सेल लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे की नाही याची खात्री होईल. अशी आमची कुडाळातील स्थानिक कापड व्यापाऱ्यांची मागणी आहे.असे या निवेदनात म्हटले आहे.
कुडाळ नगर पंचायतचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष व अध्यक्ष बाजार समिती, कुडाळ, पोलिस अधीक्षक, पोलीस स्टेशन कुडाळ आणि अध्यक्ष, व्यापारी संघटना, कुडाळ.याना या निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या. यावेळी श्रीराम शिरसाट, ऋषिकेश शिरसाट, कौस्तुभ पाटणकर, शार्दूल घुर्ये, रमा नाईक, फरान खान, शिवप्रसाद राणे, गौरीश धुरी, डाटा बोभाटे, सचिन सावंत, सौरभ शिरसाट, कुणाल पावसकर, निलेश परब, बाळा चव्हाण, राकेश वर्दम, नितीश म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!