ग्रामीण भागातील मुलांना शास्त्रीय संगीत शिकता यावे याकरिता हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा

पंडित वसंत मराठे यांचे प्रतिपादन

आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात ‘गुरुपौर्णिमा २०२३’

शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या शहरातील मुलांना गुरु मिळणे सहजरित्या शक्य आहे. मात्र, ग्रामीण भागातील मुलांना सहजरित्या गुरु मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी कणकवलीसारख्या ग्रामीण भागातील मुलांना शास्त्रीय संगीत शिकता यावे म्हणून वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली संचलित पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्र व तबला प्रशिक्षण केंद्र गुरु मिळवून देत आहे, ही बाब निश्चितपणे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पंडित वसंत मराठे यांनी केले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली संचलित पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्र व तबला प्रशिक्षण केंद्रातर्फे आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात ‘गुरुपौर्णिमा २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मराठे बोलत होते.
यावेळी पं. समीर दुबळे, पं. चारुदत्त फडके,अनघा बर्वे, आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अँड.एन.आर. देसाई, कार्यवाह शरद सावंत, खजिनदार धनराज दळवी, सहकार्यवाह राजेंद्र राऊळ, विश्वस्त डॉ. समीर नवरे, दामोदर खानोलकर, कार्यकारिणी सदस्य लीना काळसेकर, सीमा कोरगावकर, मिलिंद बेळेकर, प्रसन्ना देसाई, सघन गान केंद्राचे मनोज मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. मराठे म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे वेगळी ओळख आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाट्य व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. १६ वर्षांपूर्वी पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्र याठिकाणी सुरु केले. या केंद्रातून अनेक गायक घडत आहेत. याचे श्रेय पं. समीर दुबळे व हे त्यांच्या शिष्यांना जाते. समीर दुबळे हे सबल गुरु असून त्यांच्या शिष्यांना शास्त्रीय संगीताचे सर्वकष ज्ञान मिळत आहे. १६ वर्षे हे केंद्र नेटाने चालत असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील संगीताची आवड असलेल्या मुलांना होत आहे.
चारुदत्त फडके म्हणाले, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे सांगीतिक उपक्रम खूप चांगले असतात. संगीताची आवड असलेल्या ग्रामीण भागातील मुलांना शास्त्रीय संगीताचे धडे घेता यावेत, याकरिता आचरेकर प्रतिष्ठानने पं. जितेंद्र अभिषेकी सधन गान केंद्र सुरु केले आले असून त्याचा फायदा नवोदित गायकांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
समीर दुबळे म्हणाले, पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्र व तबला प्रशिक्षण केंद्रातर्फे गेल्या वर्षापासून आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा केला जात आहे. या केंद्रात संगीत व शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम म्हणजे वार्षिक परीक्षा असून त्यांना सर्वासमोर संगीत सादर करण्याची संधी उपलब्ध होते.
आरंभी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत अँड एन आर देसाई यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. उद्घाटनीय कार्यक्रमांनतर दामोदर खानोलकर यांनी बिहार राग आळवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सघन गान केंद्राचे शिष्य व श्रोते उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!