‘ राखी सैनिकांसाठी ‘नडगिवे नं.१च्या विद्यार्थ्यांचा अनोखा सामाजिक सेवाभाव उपक्रम.

कणकवली/मयुर ठाकूर
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं१च्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांतंर्गत स्वनिर्मित विविध प्रकारच्या राख्या तयार करुन या राख्या ‘हिसार’हरियाणा मधील भारतीय जवानांसाठी पाठविल्या आहेत.या राख्या अत्यंत अल्पखर्चिक,आकर्षक व पर्यावरण पूरक असून त्या विविध रंगी, विविध आकारात असून राख्यांवर देशभक्ती, पर्यावरण,स्वच्छता, आरोग्य, अशा विविध विषयांवर घोषवाक्य लिहिली आहेत.
आपल्या देशाचे जवान सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करतात. त्यांच्या देशसेवेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी. देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावं, त्यांच्याही जीवनात आनंदाचे व सुखाचे क्षण यावेत.भारतीय सण- उत्सव व परंपरा यांचे पावित्र्य राखले जावे.या उदात्त उद्देशाने या राख्या तयार करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका श्रीम.अनिता पाटकर मॅडम यांनी सांगितले. या उपक्रमासाठी मा.सौ.प्रेरणा मांजरेकर (शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग-तरेळे) मा.श्री संजय पवार (केंद्रप्रमुख-शेर्पे खारेपाटण) यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सतीश कर्ले, नडगिवे सरपंच मान. सौ माधवी मण्यार, माजी सरपंच मा.श्री. अमित मांजरेकर,व्य.स.सदस्य,पालक संघ, तसेच गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तींनी मुलांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमासाठी पदवीधर शिक्षिका श्रीमती प्रभा अकिवाटे, श्री.संदीप कदम, श्रीम. शितल कासले व सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.