‘आम्ही अधिकारी होणारच !’ चे वेंगुर्ल्यात आयोजन …
सावंतवाडी
सध्या जिल्ह्यातील तरुणांना तलाठी प्रवेशाचा रस्ता खुणावतो आहे. अनेक सामान्य मध्यमवर्गीय तरुण या परिक्षेसाठी तयारी करत आहेत. ह्यासोबतच जिल्ह्यातील तरुणांचा स्पर्धा परिक्षांकरिता तयारी करण्याचा कल वाढतो आहे. ह्याच गोष्टींची दखल घेत मल्टी स्कील रिसर्च एन्ड सेंटर या संस्थेने वेंगुर्ले शहरातील सिद्धीविनायक मंगल कार्यालय येथे शनिवार दि.५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे ज्या मध्ये मुंबई स्थित प्रतिथयश स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा.अमेय महाजन उपस्थितीत तरुण वर्गाचे त्यांच्या या तलाठी प्रवेश परिक्षेसंबंधित तसेच यु.पी.एस.सी तथा एम.पी.एस.सी परिक्षेसंबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत. प्राध्यापक महाजन हे स्वतः मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील समाजसेवा शास्त्रातील पद्वीओत्तर पदवीधर असून एम.फिल. , एल.एल.बी , एम.ए. यात सुद्धा पदवीधर आहेत. मुंबईतील अनेक प्रतिथयश संस्थांवर त्यांचा कार्याचा ठसा त्यांनी गेल्या बारा वर्षांच्या कार्यकाळात उमटवलेला आहे. सोबतच मुंबई रेल्वे पोलीस, गडचिरोली पोलीस , पालघर पोलीस , शिरुर नगरपालिका , कल्याण-डोंबिवली नगरपालिका या आस्थापनांसोबत अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. सदरील कार्याशाळा पूर्णतः विनामूल्य तत्त्वावर असून या उपक्रमाचा लाभ तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील इच्छुकांनी घ्यावा असे आवाहन मल्टी स्किल रिसर्च एन्ड ट्रेनिंग सेंटर चे श्री विजय रेडकर आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.