‘त्या’मुळेच निलेश राणेंना पोटशूळ !

शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी त्यांची टीका
हि तर निवडणूक डोळ्यसमोर ठेऊन निलेश राणे यांची स्टंटबाजी !
प्रतिनिधी । कुडाळ : नारायण राणे मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रसातळाला गेलेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी वैभव नाईक यांनी आमदार झाल्यानंतर सातत्याने प्रयत्न केले. विधानसभेत याविषयी आवाज उठवून, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या मंत्री महोदयांना निवेदने देऊन कुडाळ येथे जिल्हा महिला बाल रुग्णालय उभारून त्यात आवश्यक सोयी सुविधा मिळवून दिल्या. महिला बाल रुग्णालयात जिल्ह्यातील पाहिले मॉड्युलर प्रसूती गृह उभारण्यात आले आहे. रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर, तज्ञ कर्मचारी भरती, रुग्णवाहिका अशा विविध दर्जेदार सुविधा आ. वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णालयात जवळपास ३५० महिलांच्या यशस्वीरित्या प्रसुत्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात हे रुग्णालय नावारूपास येत आहे.येथील डॉक्टर व कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा देत आहेत. मात्र निलेश राणेंनी महिला बाल रुग्णालयात भेट देऊन आ. वैभव नाईक यांच्यावर आरोप केले. महिला बाल रुग्णालयातील अद्ययावत सोयी सुविधांमुळे राणेंच्या पडवे येथील खाजगी रुग्णालयातील पेशंट संख्या घटली आहे आणि त्यामुळेच निलेश राणेंनी आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप केले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केली आहे.
राजन नाईक पुढे म्हणाले, मुख्यमंत्री,पालकमंत्री अशी पदे भूषविणारे नारायण राणे २५ वर्षे सत्तेत असून देखील त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न सोडविता आला नाही.अथवा त्यांनी प्रयत्नही केले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न म्हणजे पैसे कमविण्याची संधी समजून राणेंनी आपले खाजगी रुग्णालय उभारले. याउलट आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात शासकीय मेडिकल कॉलेज होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांची स्वप्नपूर्ती झाली. महिला बाल रुग्णालयात ज्या सुविधा आहेत त्या खाजगी रुग्णालयात देखील नाहीत. आ.वैभव नाईक यांनी २५ कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करून अद्ययावत महिला बाल रुग्णालय उभारले आहे. आणि प्रत्यक्षात हे रुग्णालय सुरु आहे. रुग्णालयात आवश्यक फर्नीचरसाठी जिल्हा नियोजन मधून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोविड काळात हे रुग्णालय कोविड सेंटर म्हणून कार्यरत होते. हजारो रुग्ण याठिकाणी बरे होऊन गेले. मात्र राणेंच्या पडवे हॉस्पिटल मध्ये रूग्णांना लुटण्याचा धंदा सुरु करण्यात आला होता. मयत झालेल्यांच्या नातेवाईकांना पूर्ण पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यात येत नव्हते. त्यांना ताटकळत ठेवले जात होते.
निलेश राणे खासदार असताना त्यांनाही कधी जिल्ह्याच्या आरोग्याचा प्रश्न सोडविता आला नाही. गेल्या अडीच तीन वर्षात कधी त्यांनी रुग्णालयांना भेटी दिल्या नाहीत. आता फक्त निवडणूक डोळ्यासमोर असताना त्यांची स्टंटबाजी सुरू आहे. आ. वैभव नाईक हे गेली ८ वर्षे मतदारसंघासाठी झटत आहेत. जिल्ह्यात आरोग्य सुविधा पुरवित आहेत. महिला बाल रुग्णालय हे त्यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे. याचा पोटशूळ निलेश राणेंना आहे.मात्र कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार निलेश राणेंना नाही अशी टीका राजन नाईक यांनी केली आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.