आंबोलीत डोक्यात दगड घालून मारहाण !

दत्ताराम कर्पे जखमी, यापूर्वी सुद्धा जाधव यांच्याकडून कर्पे कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण, आंबोली पोलीस दूरक्षेत्र यांच्याकडे तक्रार दाखल

सावंतवाडी : आंबोली-बाजारवाडी येथील राहणारे दत्ताराम रामचंद्र कर्पे हे आज (रविवार) सकाळी ११.३० च्या सुमारास स्वमालकीचा मांगर असलेल्या ठिकाणी आपल्या मामेभावाचा मुलगा मयुरेश मनोज पारकर (वय १२), पुतण्या तनुश पांडुरंग कर्पे (वय ४), आई सुवर्णलता रामचंद्र कर्पे (वय ७४) आणि वहिनी प्रतीक्षा पांडुरंग कर्पे यांच्यासह गेले होते. त्यावेळी आंबोली-बाजारवाडी येथील विनोद विजय जाधव, विजय कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव हे आपल्या मांगरापाठीमागे चिरे घेऊन बांधकाम करीत होते. त्याबाबत दत्ताराम कर्पे यांनी विचारणा केली असता त्याचा जाधव त्यांना राग आला. यावेळी विजय कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव, विनोद विजय जाधव यांनी दत्ताराम कर्पे यांना पुन्हा या जमीन जागेत आल्यास तुम्हाला कायमचा संपविणार अशी धमकी देवून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
तर विनोद जाधव यांनी दगड हातात धरून दत्ताराम रामचंद्र कर्पे यांच्या डोक्यावर मारला. तसेच सुवर्णलता आणि वहिनी प्रतिक्षा यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी विजय जाधव यांची पत्नी विद्या हिने त्यांच्या घरासमोर बांधून ठेवलेला कुत्रा आपल्या अंगावर सोडून दिला. सदरचा कुत्र्याने वहिनी प्रतीक्षा यांच्या हाताचा चावा घेतल्याने वहिनीला दुखापत झाली आहे, अशी कायदेशीर तक्रार आंबोली-बाजारवाडी येथील राहणारे दत्ताराम रामचंद्र कर्पे यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत आंबोली पोलीस दूरक्षेत्र यांच्याकडे केली आहे. याबाबत पोलीस प्रशासन अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वी १५ ऑगस्ट २०२१ सुद्धा सुवर्णलता रामचंद्र कर्पे यांना जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज ही घटना घडली असून आंबोलीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विजय कृष्णा जाधव, सुधाकर कृष्णा जाधव, विनोद विजय जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी दत्ताराम कर्पे यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सावंतवाडी

error: Content is protected !!