तिलारी धरणातील पाणी अखेर तिलारी नदीत सोडले
नदीकाठावरील लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
दोडामार्ग
तिलारी धरणाचे पाणी अखेर खळग्यातील धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्यात सोडण्यात आले. खळग्यातील धरणातून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी धरणाचे चारही दरवाजे उघडून पाण्याला वाट करून देण्यात आली.सुरवातीला धरणातून ४ हजार ५५६ लिटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे आता तिलारी नदीची पाणी पातळी वाढणार आहे.तिलारी नदीकाठावरील दोडामार्ग तालुका आणि उत्तर गोव्यातील गावातील लोकांनी नदी पार करताना,कपडे धुताना,गुरांना पाण्यासाठी सोडताना काळजी घेण्याचे आवाहन तिलारी शिषकामे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी केले आहे.
धरणातील पाण्याची पातळी १०६.९० मीटर एवढी तर सांडवा माथा पातळी १०६.७० एवढी आहे. सकाळी दहा सेंटिमीटर वरून होणारा पाण्याचा विसर्ग दहा वाजता २० सेंटिमीटरवर पोचल्याने पुच्छ कालव्यातून तिलारी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे.