मंदिरातून पळवलेली फंडपेटी मिळाली

फंडपेटी रिकामी; मणेरीतील सातेरी मंदिरात रविवारी झाली होती चोरी
प्रतिनिधी l दोडामार्ग
मणेरी येथील श्री सातेरी मंदिरातून रविवारी रात्री पळवलेली फंडपेटी मंदिरापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर गुरुवारी (ता. 6) एका स्थानिक शेतकऱ्याला आढळली.त्यांनी त्याबाबत गावकऱ्यांना व गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले.त्यानंतर पोलिस तेथे पोचले असता चोरट्यानी फंडपेटी फोडून त्यातील काही चिल्लर वगळता सर्व रक्कम चोरून नेल्याचे उघड झाले.पोलिसांनी ती फंडपेटी पोलिस ठाण्यात नेली आहे.
मणेरी येथील श्री सातेरी मंदिरातून रविवारी (ता. 2) रात्री फंडपेटी पळवली होती. यापूर्वी दोनवेळा मन्दिरातील समई, मिक्सर, घंटा अशा साहित्याची चोरी झाली होती. त्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरल्याने त्यांनी चक्क फंडपेटीच पळवली.फंडपेटीत पन्नास हजारांहून अधिक रक्कम असल्याची शक्यता मानकरी भगवान गवस यांनी व्यक्त केली होती. चोरटयांनी पळवलेल्या फंडपेटीतील रक्कम गायब केली.
तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. तीच संधी साधून चोरट्यांनी श्री सातेरी मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य दरवाजाची दोन्ही कुलुपे आतील फंडपेटी चोरून नेली.मंदिरात सकाळी लाईट बंद करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कुलूप फोडून कुणीतरी आत प्रवेश केल्याचे पाहिले आणि चोरीची घटना उघडकीस आली होती.
चोरीची माहिती मिळताच सोमवारी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ आले. त्यांनी सगळे ठसे मिळवले. त्यानंतर सायंकाळी उशिरा श्वानपथकही आले; पण चोरट्यांचा माग काढण्यात पथकाला अपयश आले होते.
पोलिसांकडून फंडपेटी ताब्यात
तेथील सोनू खरवत यांना गुरुवारी सकाळी मंदिरापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर ती फंडपेटी दिसली.त्यांनी त्याबाबत गावकऱ्यांना व गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी पोलिस पथकासह तेथे येत फंडपेटी ताब्यात घेतली.