घोडावत विद्यापीठास केंद्र सरकारकडून संशोधनासाठी विशेष अनुदान

जयसिंगपूर : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संजय घोडावत विद्यापीठास विज्ञान विषयातील संशोधनासाठी साठ लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.येथील प्रा.डॉ.संभाजी पवार, प्रा.डॉ के.एन तिवारी यांनी हा संशोधन प्रकल्प केंद्र सरकारला सादर केला होता.
डॉ.पवार यांच्या प्रकल्पामध्ये वातावरणीय बदलांवर परिणाम करणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड या वायूचे उपयोगी रसायनामध्ये परिवर्तन करण्यासाठी संशोधन केले जाणार आहे. तर डॉ.तिवारी यांच्या संशोधन प्रकल्पाचा उद्देश लहान सल्फर आधारित सिंथेटिक रेणू विकसित करणे हा आहे. ज्याचा उपयोग संसर्गजन्य क्षय रोगाच्या उपचारासाठीच्या औषध निर्मितीला चालना देणारा ठरेल.
भारतीय 8 हजार संशोधकांनी यासाठी अर्ज केला होता.यामध्ये 160 संशोधकांना याची मान्यता मिळाली. घोडावत विद्यापीठातील दोघा संशोधकांची यासाठी निवड होणे हे अभिमानास्पद असल्याची भावना संशोधन डीन डॉ.ए.डी सावंत यांनी व्यक्त केली.घोडावत विद्यापीठातील आणखी काही संशोधन प्रस्ताव भारत सरकार व औद्योगिक संशोधन संस्थांमध्ये प्रस्तावित असल्याबद्दलचीही माहिती त्यांनी दिली.
विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी संशोधक प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!