देवभूमी भारताचे रक्षण करण्यासाठी साधना करण्याचा निश्चय करा ! – सौ.ज्योत्स्ना नारकर
सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
देशभरात 72 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव
ब्युरो । कणकवली : जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये 365 दिवसांपैकी साधारण 150 दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. कुटुंबातील मुलांचे मन धर्मपरायण होईल. धर्म आचारशील असतो. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच अंतरातील दिव्य ऊर्जा जागृत होते. मनोबल वाढते. आत्मशक्ती जागृत होते. या दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे, या देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होणार आहे. त्यामुळे देवभूमी भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. ज्योस्त्ना नारकर यांनी या वेळी केले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या. मातोश्री मंगल कार्यालय येथे सोमवारी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच देशभरात 72 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन श्री. व सौ. प्राजक्ता प्रदीप सावंत यांनी केले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला मान्यवरांसह जिज्ञासू उपस्थित होते. सिंधुदुर्गात एकूण ९ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला.
6 भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’: यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु या 6 भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या मराठी भाषेतील ‘अध्यात्माचे प्रास्ताविक’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली.