उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील गुरुकुल विद्यार्थी वसतिगृह प्रशासन व विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
मूळदे(. कुडाळ)डॉ. संदीप. गुरव
हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती ……सापडेना वाट ज्यांना हो तयाचा सारथी…या उक्तीप्रमाणे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आलेले आहे. कुडाळ तालुक्यातील अनाव येथे समाजातील अनाथ,अपंग,वयोवृध्द निराधार लोकांची सेवा करण्यासाठी गेली कित्येक वर्ष संविता आश्रम ही संस्था कार्यरत आहे. आजपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून या आश्रमा सोबत महाविद्यालयाचे एक घरगुती नाते निर्माण झाले आहे. वेळोवेळी महाविद्यालय या आश्रमातील अनाथांसाठी मदतीचा हात देत आलेला आहेच.
अनाथाश्रमातील लोकांना कपड्याची निकड नेहमीच लागते. त्याच्या पूर्ततेसाठी गेले महिनाभर मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर, वसतिगृह प्रमुख डॉ.संदीप गुरव, वसतिगृह चिटणीस डॉ.गिरीश उईके व डॉ.महेश शेडगे तसेच वसतिगृह प्रशासनातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी न वापरातील कपडे एकत्र गोळा केले.
आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुकुल विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेले हे कपडे सांविता आश्रम चे जनसंपर्क अधिकारी श्री.कामत यांच्याकडे सुपुर्द केले. या प्रसंगी वसतिगृह प्रमुख डॉ.संदीप गुरव, कृषी सहाय्यक श्री.ज्ञानेश्वर सावंत, प्रयोगशाळा सेवक श्री.अतुल कडगावकर, श्री.प्रशांत पालव व वसतिगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थितीत होते.
भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात कपडे व जीवनावश्यक वस्तू या आश्रमासाठी मदत म्हणून संकलित करण्याचा मानस आहे. या उपक्रमासाठी सर्वांनीच स्वेच्छेने हातभार लावावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रत्येकाने एकदा तरी या आश्रमाला भेट देऊन या निराधार,गरजू लोकांच्या वेदनेवर फुंकर घालणे गरजेचे आहे व या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते…………
एक दिवस माणसामधला
माणूस म्हणून जगेन म्हणतो,
मानवतेच्या मारेकऱ्यांशी
इथे लढा देईन म्हणतो,
समाजातील निराधार दुर्बलांसाठी
लोकसेवा करेन म्हणतो,
एक दिवस माणसामधला
माणूस म्हणून जगेन म्हणतो….