बांधकाम मंत्र्यांची ठेकेदारांनी घेतलेली भेट “कट” ठरवण्यासाठी?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ठेकेदारांच्या भेटीवर गंभीर आरोप
बांधकाम मंत्री असूनही जिल्ह्यातील विकास प्रक्रियेत सुधारणा नाही
राज्याचे बांधकाममंत्री जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळाले तरी जिल्ह्याच्या विकासात फरक पडला नाही. वर्ष झाले तरी सार्वजनिक बांधकामच्या कार्यपद्धतीत कोणताच फरक पडला नाही.पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसून निधी आणल्याच्या केवळ घोषणाच करत आहेत. गोव्यातील रस्ते चकाचक असतात मग सिंधुदुर्गात दर्जेदार रस्ते का होत नाही ? असा सवालही माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले,ज्या रस्त्यांना वर्षभरात किंवा वॉरटी कालावधीत खड्डे पडतात, त्याबाबत जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिणवणे मनसे खपवून घेणार नाही. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबतच्या माहितीसाठी थेट जनतेचा सहभाग असावा यासाठी तांत्रिक सल्लागारांच्या कार्यशाळा मनसेमार्फत घेणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेले व जिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या बिलांसाठीचा निधीही हे मंत्री देऊ शकले नाहीत, हे ठेकेदारांच्या भेटीतून उघड झाले. मात्र, ठेकेदार व अधिकारी हे पैसे यावेत म्हणून गेले होते की ‘कट’ ठरविण्यासाठी गेले होते? असा सवाल करत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीकडे मनसे लक्ष ठेऊन असल्याचे माजी आम. परशुराम उपरकर यांनी सांगितले.
परशुराम उपरकर म्हणाले, समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात २५ जण होरपळून ठार झालेत. सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात. मात्र अवघ्या ८ दिवसांत नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडू लागलेले आहेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १४ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.
सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आणि ठेकेदारानी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घेतलेल्या भेटीतून जिल्ह्यात रस्ते कामांसाठी निधी आला नसल्याचे सिद्ध झाले आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच सिंधुदुर्गातही अपघात घडण्याची शक्यता आहे. रस्ता बनवल्यानंतर वॉरंटी पिरियड मध्ये किती ठेकेदार रस्ता दुरुस्ती करतात ? हा प्रश्न निरुत्तरीत आहे. ठेकेदार आता डांबर वाढविण्याच्या विषयावर बोलत आहेत. मात्र, अनेकदा रस्ता कामात सिलकोट ॲटम खाल्ला जातो, असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला.
राष्ट्रीय महामार्गावरून एकेरी वाहतूक करण्याचे आश्वासन दिलेले होते, त्याचे काय झाले? आता मंत्री वक्तव्य बदलतात. जिल्ह्याला लाभलेले व सुपूत्र असलेले दोन्ही मंत्री जिल्हयाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जिल्हा पुन्हा उपेक्षितच राहणार आहे. गणेशोत्सवापूर्वी पुन्हा चार दिवस खड्डेमुक्तीची घोषणा होईल. अशीच घोषणा चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना करण्यात आली होती. ज्या रस्त्यांना वर्षभरात किंवा वॉरटी कालावधीत खड्डे पडतात, त्याबाबत जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिनवणे मनसे खपवून घेणार नाही असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.
कणकवली प्रतिनिधी




