अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी युवकाला जामीन

ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीस वारंवार त्रास देऊन ती घरी एकटी असताना मोबाईल चेक करून व तिला जबरदस्तीने भेटण्यासाठी बोलावून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी कौस्तुभ अरुण एकावडे याची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सानिका जोशी यांनी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मागील सुमारे सात महिन्यांपासून आरोपी हा ओळखीचा फायदा घेऊन तिला वारंवार त्रास देत असे. तिने कुणाशी बोलायचे नाही, व्हॉटस्अपवर ऑनलाईन रहायचे म्हणून सक्ती करत असे. तसेच ती एकटी रस्त्याने जात असताना तिचा पाठलाग करून तिला आपल्यासोबत येण्याची सक्ती केली होती. तसेच तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम १२, भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ड, ३४१, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली होती. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीतर्फे केलेला जामीन अर्ज मंजूर करत न्यायालयाने त्याची सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता केली. यात पीडितेच्या राहत्या ठिकाणापासून दूर राहणे, तपासात सहकार्य करणे, अशा स्वरूपाचा गुन्हा पुन्हा न करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
कणकवली प्रतिनिधी





