किल्ले खारेपाटण येथे माहिती दर्शक फलकाचे लोकार्पण संपन्न

खारेपाटण किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती खारेपाटण येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले खारेपाटण माहिती दर्शक फलकाचे लोकार्पण ही करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच श्री सौ प्राची इसवलकर, कालभैरव – दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट खारेपाटणचे अध्यक्ष श्री मधुकरशेठ गुरव शिवप्रेमी ऋषिकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी खारेपाटण एस टी बस स्थानक येथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची फुलांनी सजवलेल्या पालखी मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. खारेपाटण बाजारपेठ ते खारेपाटण शिवकालीन किल्ला व दुर्गादेवी मंदिर येथे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ही मिरवणूक नेण्यात आली.यामध्ये असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता.यावेळी गड किल्ले संवर्धन समितीच्या वतीने ऐतीहासिक प्राचीन किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून “खारेपाटण किल्ले – माहिती दर्शक फलकाचे अनावरण खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि गड देवतेचे पूजन करून सामुदायिक महाआरती करण्यात आली. तर गड किल्ले संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांचे खारेपाटण गावच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी देवगड तालुक्यातील मणचे व पाटगाव येथील ढोल ताशा पथक तसेच सहासी मर्दानी खेळाची खास प्रत्यशिके तरुणांनी करून दाखविली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी ऋषिकेश जाधव व सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव तसेच शिवजयंती उत्सव मंडळ तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती यांनी केले होते.
अस्मिता गिडाळे,खारेपाटण





