कुडाळ स्टॅण्डवर वाढले चोऱ्यांचे प्रमाण 

प्रशासनाकडून दुर्लक्ष, प्रवाशांसाठी स्टॅण्डवर शेडची आवश्यकता

कुडाळ ; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या कुडाळ शहरातील एसटी स्टॅन्डवर मूलभूत सेवांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी कुडाळ एसटी स्टॅन्ड नव्या स्वरूपात आणि नव्या पद्धतीने बांधण्यात आले. यामुळे कुडाळ एसटी स्टॅण्डचा परिसर सुयोग्य झाल्याचा  वाटत होते. परंतु, या स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सेवा नसल्याचे दिसून येत आहे. 
   कुडाळ एसटी बसस्थानक कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे. पण आज प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था येथे नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट बघत उभेच राहावे लागत आहे. या स्टँडच्या परिसरात शेड नसल्याने दुपारपासून प्रवाशांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे शेडसाठी मागणी केलीय. मुख्य म्हणजे कुडाळ एसटी स्टॅन्ड हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य केंद्र असल्याने जिल्ह्याच्या बाहेरूनही प्रवाशीही येथे येत असतात. सध्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे एसटी स्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. याबाबत कुडाळ पोलिसांनी सुद्धा एसटी प्रशासनाकडे सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती. परंतु, याबाबत एसटी प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

रोहन नाईक, कुडाळ

error: Content is protected !!