सिंधुदुर्गात शिवसेना उबाठाकडून १०० वनराई बंधाऱ्यांचा उपक्रम

पावशी, मुळदे येथे वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी साठवणुकीसाठी पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी साठवणूक आणि जलसंवर्धनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे उभारण्यात येणार आहेत. शिवसैनिकांच्या श्रमदानातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ पावशी आणि मुळदे येथे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, यंदा पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता नागरिकांना आवश्यक पाणीसाठे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पावशी आणि मुळदे येथे दोन बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून यापूर्वीही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा जलसंवर्धनाचा उपक्रम राबविला जात असल्याचे नाईक यांनी सांगितले. वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून स्थानिक पातळीवर पाणीसाठा निर्माण करण्यास तसेच आगामी काळातील पाणीटंचाईला काही प्रमाणात तोंड देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पावशी आणि मुळदे येथे बंधाऱ्यांच्या शुभारंभावेळी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत वैभव नाईक तसेच सहभागी शिवसैनिकांचे आभार मानले.
यावेळी पावशी येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळा पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती गटनेते योगेश धुरी, अमित राणे, उपविभागप्रमुख सचिन ठाकूर, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, माणगाव उपसरपंच बापू बागवे, मनीष तोटकेकर, बाबू वायंगणकर, राजन तवटे, शैलेश घाडी, जयराम वराडकर, प्रसाद शेलटे, बाबा पावसकर, बाबा खोत आदी उपस्थित होते.
मुळदे येथे उपसरपंच प्रवीण पालव, भिवा पालव, माजी सरपंच संजय पालव, ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा पालव, शशिकांत पालव यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!