सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर विव्हळत पडलेल्या निराधार वृद्धाला जीवन आनंद संस्थेचा आधार

कुटुंबीय आणि समाजाने नाकारल्याने गेल्या काही दिवसांपासून सानपाडा (नवी मुंबई) रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेत पडून असलेल्या दिलीपकुमार (वय ६२, मूळ गाव – जबलपूर) यांना जीवन आनंद संस्थेने माणुसकीचा आधार दिला.

डाव्या पायाला गंभीर जखम झाल्याने दिलीपकुमार वेदनेने विव्हळत रस्त्यावर पडून होते. जखमेची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. त्यांच्या जखमेत मोठ्या प्रमाणात अळ्या झाल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी पुढाकार घेत दिलीपकुमार यांच्या डाव्या पायाची जखम स्वच्छ केली. जखमेत असलेल्या हजारो अळ्या काढून जखमेची प्राथमिक स्वच्छता करण्यात आली.

त्यानंतर त्यांची दाढी करून, स्वच्छ कपडे घालून त्यांना सन्मानाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रस्त्यावर निराधार अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे.

यावेळी संदिप परब यांनी या कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच सहकारी गोविंद मार्गी, भूषण मार्गी, संपदा सुर्वे, निलेश कोचरे सर आणि पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. “रस्त्यावर निराधार अवस्थेत पडलेल्या आपल्या बांधवांची सेवा करताना मिळणारे समाधान शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशा व्यक्तीला पुन्हा माणुसकीचा आधार आणि सन्मान मिळवून देणे, हीच आमच्यासाठी खरी सेवा आहे,” अशी भावना संदिप परब यांनी व्यक्त केली.

जीवन आनंद संस्थेच्या या कार्यामुळे सानपाडा परिसरात रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या एका निराधार व्यक्तीला वेळीच उपचार आणि माणुसकीचा आधार मिळाला.

error: Content is protected !!