म्हापणच्या सड्यावर ‘हरणे’ आणि ‘निळी परडी’च्या फुलांची उधळण

गणरायाच्या आगमनाची निसर्गाला चाहूल !
गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणच्या निसर्गरम्य वातावरणातही उत्साहाचे रंग भरू लागले आहेत. म्हापण येथील पठारावर सध्या पारंपरिक ‘हरणे’ आणि ‘निळी परडी’ या रानफुलांची मनमोहक उधळण पाहायला मिळत असून, फुलांनी सजलेले माळरान निसर्गप्रेमींचे विशेष आकर्षण ठरत आहे.
पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची जणू साक्षच देणारी ही रंगीबेरंगी रानफुले पठारावर बहरली आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारे हे मनोहारी दृश्य सध्या म्हापण परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहे. हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उमललेली निळी, पांढरी आणि विविध छटांची फुले पाहताना निसर्गानेच गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट केल्याचा भास होत आहे.
गणेशोत्सवाच्या परंपरेशी घट्ट नाते
कोकणातील गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीत ‘हरणे’ची फुले आणि ‘निळी परडी’ यांना विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या काळात घरातील माटवी सजवण्यासाठी पूर्वापार या रानफुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या फुलांचे बहरणे हे केवळ निसर्गसौंदर्य नसून कोकणच्या लोकपरंपरा आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेले एक भावनिक नाते आहे.
फुलांचे घटते प्रमाण चिंतेचा विषय
मात्र, या निसर्गसौंदर्यामागे चिंतेची किनारही आहे. बदलते हवामान, पर्यावरणातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम या रानफुलांच्या वाढीवर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत या फुलांचे प्रमाण कमी होत असल्याचेही दिसून येत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पारंपरिक रानफुलांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत असताना, त्यांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाचे जतन करण्याची गरज व्यक्त होत आहे. म्हापणच्या पठारावर सध्या उमललेली ही फुले निसर्ग आणि संस्कृतीच्या अनोख्या संगमाचे दर्शन घडवत आहेत.






