अपेक्षित चार महिन्यांऐवजी दोन महिन्यांतच भातपीक परिपक्व

रत्नागिरी-८ भात बियाण्याची तातडीने चौकशी करा
योगेश धुरी यांची कृषी विभागाकडे मागणी
माणगाव खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी महा ऍग्रो कंपनीचे ‘रत्नागिरी-८’ जातीचे भात बियाणे खरेदी करून लागवड केली आहे. हे पीक साधारण चार महिन्यांत परिपक्व होईल, असे सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात अवघ्या दोन महिन्यांतच भात पीक परिपक्व होण्यास सुरुवात झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून, कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माणगाव खोरे हे भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे भात हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी ‘रत्नागिरी-८’ बियाण्याचा वापर केला. मात्र अपेक्षित कालावधीपेक्षा पीक लवकर परिपक्व होत असल्याने कापणीपूर्व काळात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाताच्या लोंब्या पावसामुळे जमिनीवर पडणे, दाण्यांची गुणवत्ता घसरणे तसेच उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित बियाण्याची गुणवत्ता, कंपनीने सांगितलेला पीक कालावधी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती याबाबत कृषी विभागाने सखोल तपासणी करावी. चौकशीत बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कंपनीकडून नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी. तसेच दोष आढळल्यास कंपनीविरोधात आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पावती नसली तरी शेतकऱ्यांना न्याय द्या
काही शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीची पावती उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ पावती नसल्याच्या कारणावरून संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. विक्रेत्यांचे विक्री रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, उपलब्ध इतर कागदपत्रे तसेच प्रत्यक्ष पीक पाहणीच्या आधारे शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना न्याय द्यावा, असेही सांगण्यात आले.
“शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरा जात आहे. बियाण्यामुळे त्याचे नुकसान झाले असेल तर त्याला न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना विनाकारण कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावू नका आणि त्यांना त्रास देऊ नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. त्यांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढू,” असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी दिला.
कृषी विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पीक पाहणी, पंचनामा व चौकशी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभागप्रमुख एकनाथ धुरी, उपविभागप्रमुख शैलेश विर्नोडकर तसेच माणगाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील सावंत उपस्थित होते.






