गणेशोत्सवापूर्वी कुडाळातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा !

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

हिंदू धर्मीयांचा प्रमुख सण असलेला श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना कुडाळ शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत नागरिक व वाहनांची मोठी गर्दी होणार असल्याने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांना लेखी निवेदन दिले.
कुडाळ शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच चौकाचौकांत सध्या मोठ्या प्रमाणात गुरे-वासरे मोकाट फिरताना तसेच ठाण मांडून बसताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढल्यास वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः रस्त्याच्या कडेला भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना या मोकाट जनावरांचा मोठा फटका बसत आहे. जनावरे विक्रेत्यांच्या दुकानातील भाजीपाला व इतर साहित्य खाऊन नुकसान करत असल्याने आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या गरीब विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा मोठा आधार असतो. त्यामुळे त्यांचे नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, नागरिक व व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नगरपंचायतीने मोकाट जनावरांना पकडून त्यांची योग्य त्या कोंडवाड्यात अथवा गोशाळेत व्यवस्था करावी, अशी मागणी मंदार शिरसाट यांनी केली आहे.
या लोकहिताच्या मागणीची नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन गणेशोत्सवापूर्वीच मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक मंदार शिरसाट व युवासेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर आणि गुरु गडकर उपस्थित होते.

error: Content is protected !!