कुडाळ एसटी आगाराला कुणी ‘वाली’च नाही!

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न वाऱ्यावर
कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक नेमण्याची होतेय मागणी
कुडाळ : सिंधुदुर्ग विभगाचा कुडाळ एसटी आगार हा नेहमीच समस्यांच्या गर्दीत असतो. या आगारात कधी बसेसची अपुरी संख्या तर कधी स्पेअर पार्टची कमतरता तर कधी चालक-वाहकांची कमतरता जाणवत असते. यामुळे याचा आर्थिक फटका साहजिकच कुडाळ एसटी आगार आणि एसटी महामंडळाला बसतो. आधीच वेळेत न होणारे पगार यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना उपासमारीची पाळी आली आहे.
कुडाळ आगाराला ग्रामीण भागातून सर्वाधिक उत्पन्न
कुडाळ एसटी आगार हा ग्रामीण भागाशी अधिक जोडला आहे. आजही कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशी हा एसटी बसनेच प्रवास करतो. यामुळे एसटी प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळते.
पण मागील काही वर्षात विशेष करून कोरोना काळात एकूणच एसटी महामंडळाची स्थिती नाजूक झाली. महामंडळाचा तोटा वाढत गेल्याने कर्मचारी वर्गाचे पगार वेळेत होणे बंद झाले.
आगार व्यवस्थापक ‘ हे पदच रिक्त
आज कुडाळ आगारात संपूर्ण कारभार पाहणारे ‘आगार व्यवस्थापक ‘ हे पदच रिक्त आहे. कुडाळ डेपोचा कारभार हा प्रभारी असलेले मालवण आगाराचे व्यवस्थापक बोवलेकर यांच्याकडे आहे. पण दोन आगारांची जबाबदारी पाहणे हे शक्य होत नाही. साहजिकच कुडाळ आगाराच्या कारभाराकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
आज कुडाळ आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत सुटत नाहीत तर या गाड्यांना चालक – वाहक नसतो. तर कधी कधी वाहकाकडून एकूण हिशेब घेणारे उपलब्ध नसतात. त्याही पेक्षा वाहक आणि चालकांना ड्युटी लावताना दूजाभाव केला जात असल्याच्या आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
नुकताच राज्य सरकारने एसटीत महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आजच्या घडीला महिलांना देण्यात येणारी ही विशेष तिकिटेच काही वाहकांकडे उपलब्ध नसतात. एकंदरीत सिंधुदुर्ग विभागात कुडाळ एसटी आगार हा सर्वाधिक उत्पन्न देणारा आगार असताना मात्र नियोजन नसल्याने येथील व्यवस्था ढासळली आहे. म्हणजेच कुडाळ एसटी आगाराला कुणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे.
त्यासाठी या आगाराला कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक उपलब्ध होणे गरजेचे ठरणार आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ