राजन नाईक यांची अक्कल गुडघ्यात !

अरविंद करलकर यांचा पलटवार

राजन नाईक यांनी आपला व्यवसाय जाहीर करावा

मला कमिशन एजंट म्हणणाऱ्या उबाठा तालुका प्रमुख राजन नाईक यांनी त्यांचा व्यवसाय कोणता हे आधी जाहीर करावे राजन नाईक तालुका प्रमुख झाले आणि वैभव नाईक, विनायक राऊत, अमरसेन सावंत यांचा पराभव झाला. माझी लायकी काढणाऱ्या राजन नाईक यांनी त्यांची अक्कल गुडघ्यात का आहे याचा पहिला विचार करावा. त्यामुळे यापुढे राजन नाईक काही बोलले तर जशासतसे उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी दिला आहे. कुडाळ शिवसेना कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केलेल्या टीकेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी उत्तर देत पलटवार वार केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद करलकर म्हणाले, राजन नाईक यांनी माझ्यावर मी कमिशन एजंट असल्याचा आरोप केला आहे. मी गेली २७ वर्ष कुडाळमध्ये आहे. राजन नाईक यांनी सर्वप्रथम त्यांचा व्यवसाय कुठला ते जाहीर करावे. उदरनिर्वाहासाठी कोणतेही काम करत नसताना सुद्धा त्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे. गेली पंधरा वर्ष ते तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ठेकेदाराकडून टक्केवारी घेणे हेच त्यांचे काम आहे. स्वतः भाड्याच्या घरात राहतात पण उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे पैसा येतो कुठून ? कोणाची तरी गाडी घेऊन गोव्याला जायचे. तिथे विमानाची तिकीट तयार असतात. विमानाने पुढे कुठे जातात ते देखील मी जाहीर करेन असा इशारा श्री. करलकर यांनी दिला.
अरविंद करलकर पुढे म्हणाले कि, राजन नाईक यांनी त्यांना ‘आयात केलेला’ असा आरोप केला आहे. पण आयात करायला मी काय पाकिस्तानातून पडलो आहे का ? माझे गाव कुडाळ आहे, बावमध्ये राहतो. मग मी आयात केलेला कसा. उलट राजन नाईक हे केरवड्याचे, कुडाळमध्ये येऊन राहिले आहेत. मला आयात केलेला म्हणताना त्यांचा रोख वैभव नाईक यांच्याकाडे असावा. कारण वैभव नाईक कणकवलीचे आहेत. ते कुडाळमधून निवडून आले होते. म्हणजे ते आयात आहेत कि अरविंद करलकर आयात आहेत ? असा सवाल श्री. करलकर यांनी उपस्थित केला.
अरविंद करलकरना दोन मते पडली या राजन नाईक यांच्या वक्तव्यावर बोलताना श्री. करलकर म्हणाले, कि मी उबठात असताना पाचशे ते साडेपाचशे मते मिळायची. पण मी शिंदे शिवसेनेत गेल्यावर उबाठाची मते २४० वर आली. वैभव नाईक हे आपल्यामुळे निवडून आले. पण राजन नाईक याना बिट्टू तेली सारख्या नवख्या उमेदवाराने निवडणुकीत पराभव केला होता. राजन नाईक यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी कुडाळच्या सतरा पैकी कोणत्याही वॉर्ड मध्ये उभे राहून निवडून येउन दाखवावे, असे आव्हान श्री. करलकर यांनी दिले.
राजन नाईक तालुका प्रमुख झाल्याबरोबर वैभव नाईक यांचा पराभव झाला. विनायक राऊत यांचा पराभव झाला. एवढंच कशाला, ज्या अमरसेन सावंत यांच्यासोबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माझ्यावर आरोप केले ते पण निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे राजन नाईक हेच काळ्या पायाचे आहेत, असा टोला श्री. करलकर यांनी लगावला. माझी लायकी काढण्यापेक्षा तुम्हाला अक्कल आहे का ते बघा. राजन नाईक तुमची अक्कल गुडघ्यात आहे. अक्कल असती तर मतांचा फरक लक्षात आला असता तुमच्या. तसेच राजन नाईक यांनी पहिलं ते वैभव नाईक गटाचे कि विनायक राऊत गटाचे आहेत ते तरी जाहीर करावे, असे अरविंद करलकर म्हणाले.
खरंतर राजन नाईक यांनी कृष्णा धुरींचे जाऊन पाय धरले पाहिजेत. कारण कृष्णा धुरी यांच्या सांगण्यावरून राजन नाईक तालुका प्रमुखपदावर आहेत. नाहीतर पूर्ण तालुक्याचे तालुका प्रमुख कृष्णा धुरी असले असते. श्री. धुरी यांनी सांगितल्यामुळे श्री. नाईक यांचे तालुकाप्रमुख पद शाबूत आहे, असा गौप्यस्फोट श्री. करलकर यांनी केला.
मी उप शाखाप्रमुख असताना राजन नाईक तालुका प्रमुख होते. पण आज मी उप जिल्हाप्रमुख आहेत आणि राजन नाईक अर्ध्या तालुक्याचे प्रमुख आहेत हे त्यांनी विसरू नये. मला अशा टीकेला उत्तर द्यायचेच नव्हते, पण लोकांना सर्व चित्र स्पष्ट झाले पाहिजे म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली आहे. लोकांना समजले पाहिजे कि कोणी कोणत्या कामात किती पैसे घेतले ते. सर्वाना सर्वांचे धंदे माहित आहेत याकडे श्री. करलकर यांनी श्री. नाईक यांचे लक्ष वेधले.
आपल्यावर पत्रकार परिषद घ्यायला राजन नाईक यांना पाच दिवस का लागले. कारण सध्या एआयचा जमाना आहे. ती कथित ऑडिओ क्लिप तयार करून व्हायरल करायला राजन नाईक याना तेवढा वेळ लागला असेल कदाचित आणि तुम्ही माझा कोणता इतिहास काढणार ? असा सवाल श्री. करलकर यांनी केला आहे.
अमरसेन सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की सगळेच आता तसे वागू लागले आहेत. तसेच दत्ता सामंत यांच्या त्या १४ कामांबद्दलही श्री. करलकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, गेल्या दहा वर्षात रस्त्यांची चाळण झाली आहे. लोकांना चालायला मिळत नाही, त्यांची गैरसोय होते. अशा परिस्थितीत दत्ता सामंत यांनी स्वतःच्या पैशातून रस्ते केले तर कोणाला वाईट वाटायचे काय कारण ?
त्यामुळे राजन नाईक यांनी आपली पात्रता काय आहे ती ओळखावी. माझी लायकी काढण्याएवढी त्यांना अक्कल नाही. त्यांची अक्कल गुडघ्यात आहे. बिट्टू तेली यांनी पराभव केल्यामुळे राजन नाईक सैरभर झाले आहेत. काहीही बडबडत असतात. त्यामुळे यानंतर राजन काही बोलले तर जशास तसे उत्तर देण्यात येतील असा इशारा अरविंद करलकर यांनी शेवटी दिला.

error: Content is protected !!