हा तर सर्वांचा विजय – ऍड. संग्राम देसाई

ऍड. संग्राम देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत देदीप्यमान यश

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवणे यासाठी माझं सर्वोच्च प्राधान्य राहणारच आहे. त्यामुळे जनतेने आणि सहकाऱ्यांनी दाखवलेला हा विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ऍड. संग्राम देसाई यांनी दिली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत ऍड. संग्राम देसाई यांनी सहाव्या क्रमांकाची मते मिळवून देदीप्यमान यश संपादन केले. त्याबद्दल आज कुडाळ येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्ह्याभरातील वकील, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पत्रकार यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ऍड. देसाई बोलत होते.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक निकालानंतर त्या निवडणुकीत विजयी झालेल्या ऍड. संग्राम देसाई यांचे आज कुडाळमध्ये आगमन झाले. त्यांनतर त्यांच्या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन हॉटेल लाईम लाईटच्या सभागृहात करण्यात आले होते. सुरुवातीला औक्षण करून ऍड. संग्राम देसाई यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर झालेल्या सत्कार समारंभाला व्यासपीठावर ऍड देसाई यांच्या पत्नी ऍड. गौरी देसाई, जिल्हा बारचे अध्यक्ष ऍड. परिमल नाईक, सचिव ऍड. विवेक मांडकुलकर, कुडाळचे अध्यक्ष ऍड. गौरव पडते उपस्थित होते. कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या वतीने सत्काराला सुरुवात झाली. त्यांनतर जिल्हा बार असोसिएशन, सावंतवाडी, मालवण, कणकवली तालुका बार असोसिएशन, विविध संस्था, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. राजीव बिले, ऍड. अजित भणगे, ऍड. सुधीर भणगे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, पत्रकार आणि ऍड. संग्राम देसाई प्रेमी नागरिक यांच्या कडून ऍड. संग्राम देसाई यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना ऍड. परिमल नाईक यांनी ऍड. संग्राम देसाई यांचे अभिनंदन केले. ऍड. संग्राम देसाई यांचा हा विजय सोपा नव्हता. वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने या निवडणुकीत होती. पहिल्यांदाच महिला सदस्यांचा समावेश करण्यात आल्याने खुल्या प्रवर्गातून सदस्य संख्या २५ वरून १८ वर गेली होती. अशातच सिंधुदुर्ग मधील वकिलांची संख्या तुलनेने कमी होती. संपूर्ण महाराष्ट्रासोबतच गोवा, दीव, दमण इथे पण पोहोचण्याचे आव्हान होते. या सगळ्या आव्हानांवर मात करून ऍड. संग्राम देसाई यांनी एकवीसशे पेक्षा जास्त मते मिळवून सहाव्या क्रमांकाने ते निवडून आले, असे ऍड. परिमल नाही यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांना भेटून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले, त्यामुळे जिल्ह्यात ९० टक्के मतं ऍड. देसाई याना मिळाली. ऍड. संग्राम देसाई यांनी यापूर्वी केलेले काम हे सर्वांसमोर आहेच. भविष्यातही ते उत्तम काम करतील असा विश्वास ऍड. परिमल नाईक यांनी व्यक्त केला.
सत्करला उत्तर देताना ऍड. संग्राम देसाई यांनी सर्वांचे हात जोडून आभार मानले. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा, परिवाराचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवणे, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देणे या कामांना माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, तसेच जनतेने आणि सहकाऱ्यांनी दाखवलेला हा विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सत्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकील जिल्हाध्यक्ष परिमल नाईक, अमोल सामंत, विवेक मांडकुलकर, गौरव पडते, अमित हरमलकर, यतिश खानोलकर, राजीव बिले, आनंद गवंडे, अविनाश परब, श्याम सावंत, श्री. निंबाळकर, अजित भणगे, सुधीर भणगे, राजीव कुडाळकर, जिल्हा सरकारी वकील श्री. राणे, अति. जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई, सुहास सावंत, महिला वकील, जि प सदस्य रुपेश कानडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भाजपचे बंड्या सावंत, संजय वेंगुर्लेकर, मोहन सावंत, पप्या तवटे, मनसेचे जिल्हाप्रमुख धीरज परब, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. रुपेश परुळेकर यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. गौरव पडते यांनी केले.

error: Content is protected !!