वैभव नाईक यांनी निलेश राणेंवरील आरोप थांबवावे – अरविंद करलकर

भावांच्या प्रगतीमुळे वैभव नाईकांना पोटशूळ
शिंदे सेनेची जोरदार टीका
माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत, तसेच त्यांच्या दोन्ही बंधूनी नगरसेवक पदाचे राजीनामे द्यावेत, अशी ठोस मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी केली आहे. खरं तर वैभव नाईक यांनी राजन तेली यांचे पाय धरले पाहिजेत, कारण त्यांच्याच माध्यमातून शहर विकास आघाडी आकाराला आली होती. तसेच आमदार निलेश राणे हेच या निवडणुकीत स्टार प्रचारक होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली गेली. म्हणूनच निलेश राणेंचाच फोटो घेऊन रॅली काढण्यात आली होती. असा घणाघाती हल्ला शिवसेना अरविंद करलकर यांनी केला. सोमवारी शिंदे शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रवेळी सोशल मीडिया प्रमुख राजवीर पाटील आणि सरचिटणीस सुशील कदम उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद करलकर यांनी वैभव नाईक यांच्यावर गंभीर कौटुंबिक आणि राजकीय टीका केली. वैभव नाईक यांचे स्वतःचे भाऊ पुढे जात आहेत, प्रगती करत आहेत, म्हणूनच आता वैभव नाईक याना पोटशूळ उठला आहे. भावांना निवडून आणले दुसऱ्यांनी आणि आता ते उड्या मारत आहेत, असा टोला करलकर यांनी लगावला.
वैभव नाईक यांच्या निवडणूक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना करलकर म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी वैभव नाईक हे स्वतः मालवणमध्ये ठाण मांडून बसले होते. जे स्वतः मालवण सोडून बाहेर पडू शकले नाहीत, ते कणकवलीत जाऊन प्रचार कसा करणार? त्यामुळे त्यांचे दावे हास्यास्पद आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना करलकर म्हणाले, बुधवारी महागाईच्या नावाखाली जे आंदोलन करण्यात आले, ती केवळ एक ‘नौटंकी’ होती. कोथिंबीरची जुडी किंवा इतर भाजीपाला कधी स्वस्त तर कधी महाग होतच राहतो. बाजारभावातील हा चढ-उतार नैसर्गिक आहे. जर भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला, तर त्यातून आपल्याच शेतकरी बांधवांना चार पैसे मिळतात. शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडलेले विरोधकांना सहन होत नाहीत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





