निलेश राणेंच्या आरोपांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा!

माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी
माझ्या भावांच्या विजयात निलेश राणेंचा केसा एवढा वाटा असेल तरी त्यांना राजीनामा द्यायला लावीन
निलेश राणेंनी भाजपची मदत घेतल्याशिवाय निवडून येऊन दाखवावे
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह खाते पूर्णतः अपयशी ठरले आहे असा आरोप संपूर्ण महाराष्ट्रामधील विरोधी पक्षाकडून आणि जनतेकडून केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांकडून महिन्याला दोन कोटीचा हप्ता गृह खात्याला दिला जातो असा आरोप आता सत्ताधारी शिंदे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणेंनी पत्रकार परिषदेतून केला आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णता बिघडली असल्याचेही निलेश राणेंनी दाखवून दिले. त्यामुळे विरोधी पक्ष आणि जनता गृह खात्यावर जे आरोप करीत आहे त्याला निलेश राणेंच्या माध्यमातून आज पुष्टी मिळाली आहे. निलेश राणे यांच्या आरोपांप्रमाणे जर खरोखरच दोन कोटीचा हप्ता गृह खाते घेत असेल तर याची तातडीने दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि निलेश राणेंनीही आपल्या आरोपावर ठाम राहून या आरोपाचे उत्तर गृह खात्याकडून घेऊन ते जनतेला पत्रकार परिषदेतून सांगावे असे आव्हान माजी आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.
वैभव नाईक पुढे म्हणाले, निलेश राणे हे पाच वर्षे खासदार राहिले आहेत. आता ते गेले दोन वर्ष आमदार आहेत. माझ्या अनुभवानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल सत्तेतील लोकप्रतिनिधीला तक्रार असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांकडे आधी त्याची तक्रार करावी लागते. मंत्र्यांकडून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर विधिमंडळ सभागृहात आवाज उठवून चौकशी लावली जाते. त्यानुसार निलेश राणेंनी आधी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची तक्रार केली पाहिजे होती.परंतु, पोलीस अधीक्षकांच्या आडून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत निलेश राणेंनी भाष्य केले. परंतु, निलेश राणेंचेच मालवणचे नगरसेवक मालवण मध्ये बंद पडलेली मटका बुकी चालवत आहेत. मटका बुकी चालकाचे निधन झाल्यानंतर शिंदे गटाच्या नगरसेवकांनी ही मटका बुकि ताब्यात घेतली आहे. निलेश राणे यांना माहीत नसतील तर त्यांची नावे देखील मी सांगेन. अन्यथा मालवणात कोणालाही विचारलात तरी त्यांची नावे तुम्हाला कळतील. एकीकडे निलेश राणे अवैध धंद्यांवर आरोप करत आहे आणि त्यांचेच नगरसेवक अवैध धंदे करीत आहेत. त्यांच्यावर आधी निलेश राणेंनी कारवाई करून दाखवली पाहिजे.अन्यथा त्या मटका बुकि चालक नगरसेवकांकडून पोलीस हप्ते मागतात म्हणून निलेश राणे पोलीस अधीक्षकांवर आरोप करत आहेत कि काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.
माझ्यावर निलेश राणेंचा आकस नाही असे ते सांगतात. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप निलेश राणेंनी वैयक्तिक आकसापोटीच केले होते. जनहिताचे आम्ही कोणतेही आंदोलन केले तर निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांना माझ्यावर गुन्हे दाखल करण्यास लावतात.त्यामुळे वैयक्तिक आरोप निलेश राणेंनीच सुरू केले आहेत. ते माझे विरोधक आहेत त्यांनी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करावेत.त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही.
माझे दोन्ही नगरसेवक भाऊ कणकवलीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. आणि याआधीही ते त्याच प्रभागात निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या विजयात तुमचा केसा एवढाही वाटा असेल तर त्यांना मी उद्या राजीनामा द्यायला लावीन. मात्र निलेश राणे ज्यांच्यामुळे निवडून आले त्या भाजपवर आणि राज्याच्या गृह खात्यावर म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यामुळे निलेश राणेंनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजप शिवाय निवडून येण्याची हिंमत दाखवावी अशी टिका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.





