२८ वर्षांनंतरचे ‘तेच’ चेहरे, ‘तीच’ मैत्री अन् आठवणींचा मोरपिसी सोहळा! देवगडच्या स. ह. केळकर कॉलेजच्या ९७ च्या बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा संपन्न

काळ पुढे सरकत राहतो, आयुष्य बदलत जातं… पण कॉलेजच्या दिवसांतील त्या सोनेरी आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच ताज्या राहतात. याच आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी, तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देवगड येथील स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची १९९७/९८ ची बॅच पुन्हा एकदा एकत्र आली. तारामुंबरी येथील ‘राजम रिसॉर्ट’ येथे हा ‘भव्य स्नेहमेळावा २०२६’ अत्यंत भावूक, उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला.

​२८ वर्षांपूर्वी गळ्यात हात टाकून फिरणारे मित्र-मैत्रिणी जेव्हा आमनेसामने आले, तेव्हा सुरुवातीला काही क्षण शांततेत गेले. काही जण एकमेकांना लगेच ओळखत होते, तर काही जण चेहऱ्यावरच्या बदललेल्या रेषांवरून जुना सखा शोधत होते. पण एकदा का ओळख पटली, की आनंदाचा जणू पूरच आला! “अरे, तू किती बदललास!” आणि “तू अगदी तशीच आहेस ग!” या संवादांनी रिसॉर्टचा परिसर गुंजून उठला. कॉलेजच्या दिवसांतील कधी कॅन्टीनमध्ये मारलेल्या गप्पा, कधी लेक्चर बंक करण्याचे बेत, तर कधी नकळत जुळलेली ती निरागस मैत्री… सर्व काही एका क्षणात जिवंत झाले.

​कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत कृतज्ञतेने झाली. या बॅचचे सर्व सन्माननीय प्राध्यापक या सोहळ्याचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पाहून गुरूंचेही डोळे अभिमानाने भरून आले होते.
​प्रा. सोनटक्के यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “माझ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेले यश, हाच आम्हा शिक्षकांसाठी सर्वात मोठा आणि बहुमूल्य बहुमान आहे. आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण आपल्या आई-वडिलांना आणि संस्कारांना कधीही विसरू नका.” प्रा. राऊत यांनीही, २८ वर्षे उलटून गेल्यानंतरही या बॅचने प्राध्यापकांशी टिकवून ठेवलेल्या स्नेहबंधाचे कौतुक केले आणि सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रा. राऊत, प्रा.बलवान,प्रा.माने-पाटील, यांच्यासह सर्व
मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला, तसेच आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाची आकर्षक ‘की-चेन’ प्रदान करण्यात आली.

​या औपचारिक सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन दीपक शिनगारे व सचिन इनामदार यांनी आपल्या केले. तर वर्गभगिनी भक्ती कुलकर्णी आणि नीलिमा रजपूत यांनी आपल्या स्वरचित कवितांतून कॉलेज जीवनाचे ते सोनेरी दिवस हुबेहूब उभे केले, ज्यामुळे उपस्थित सर्वांचेच मन हेलावून गेले.

​दुपारच्या स्वादिष्ट भोजनानंतर सोहळ्यात अधिकच रंगत आली. या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून, या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या काही लाडक्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस अतिशय जल्लोषात आणि केक कापून साजरे करण्यात आले. एकमेकांना केक भरवताना आणि ‘हॅपी बर्थडे’ गातानाचा तो आनंद कॉलेजच्या दिवसांतील वाढदिवसांची आठवण करून देणारा ठरला.
​त्यानंतर सुरू झाला हक्काचा ‘ओळख परेड’ कार्यक्रम. यात प्रत्येकाने आपल्या कॉलेजनंतरच्या जीवनप्रवासाची, कुटुंबाची आणि सध्याच्या कार्यक्षेत्राची माहिती दिली.


​’आठवणींच्या रंगतदार मैफिलीत’ विद्यार्थ्यांनी कराओकेच्या माध्यमातून जुन्या-नव्या सदाबहार गाण्यांचे सादरीकरण केले. गाण्याचा ठेका धरताच, वयाचे भान विसरून सर्व मित्र-मैत्रिणींनी मनसोक्त डान्स केला. तो निखळ आनंद, तो अलोट उत्साह पाहून जणू काही काळ मागे सरकला आहे असेच वाटत होते.

​या सोहळ्यात या बॅचच्या यशाचा आलेख अधोरेखित करणारे काही विशेष सत्कार करण्यात आले.

या बॅचचे विद्यार्थी व वर्गमित्र अमोल जामसंडेकर यांचे बंधू अमित जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल, संपूर्ण बॅचच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. अमित जामसंडेकर यांच्या वतीने त्यांचे बंधू अमोल जामसंडेकर यांनी अत्यंत अभिमानाने हा सत्कार स्वीकारला.

नुकतीच डॉक्टरेट (PhD) पदवी प्राप्त केल्याबद्दल वर्गबंधू डॉ. विवेक चव्हाण यांचाही सर्वांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

शिक्षण विकास मंडळ, देवगडचे संचालक आणि याच बॅचचे विद्यार्थी अमोल जामसंडेकर यांचाही यावेळी यथोचित गौरव करण्यात आला.

​ हा संपूर्ण सोहळा यशस्वी व्हावा यासाठी विशेष पुढाकार घेऊन, अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या अरुण धोपटे या वर्गमित्राचा सर्व मित्रांनी एकत्र येत कृतज्ञतापूर्वक विशेष सत्कार केला.

केवळ रिसॉर्टवरच न थांबता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या स. ह. केळकर महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. आपल्या जुन्या वर्गात बसून, त्या बाकांवर हात फिरवून आणि कॉलेजच्या आवारात फेरफटका मारून सर्वांनी जुन्या आठवणी आपल्या मनात आणि कॅमेऱ्यात कैद केल्या.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अरुण धोपटे, विठू प्रभू, आसिफ मुल्ला, भक्ती कुलकर्णी यांच्यासह सर्वच मित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
​सांजवेळ झाली आणि निरोपाची ती घडी आली, तेव्हा वातावरण पुन्हा एकदा हळवे आणि भावूक झाले. एकमेकांचा हात हातात घेताना डोळे पाणावले होते, पण मनामध्ये या स्नेहमेळाव्याच्या रूपाने एका नव्या ऊर्जेचा अक्षय साठा जमा झाला होता. “दरवर्षी किमान एकदा तरी असंच एकत्र यायचं…” असं आग्रही आश्वासन आणि जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेत, सर्वजण आपल्या कॉलेज जीवनाच्या मोरपंखी आठवणी उराशी बाळगून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.
​हे एकत्र येणे केवळ भूतकाळाची उजळणी नव्हते, तर भविष्यासाठी मैत्रीचे रेशीमबंध अधिक घट्ट करणारा एक अमृताचा सोहळा ठरला!

error: Content is protected !!